‘राजाराम’ची निवडणूक रंगणार

By Admin | Updated: October 6, 2014 22:43 IST2014-10-06T22:08:55+5:302014-10-06T22:43:18+5:30

सतेज पाटील गट ‘वचपा’ काढणार : दक्षिण मतदारसंघातील राजकारणाच्या प्रतिक्रिया उमटणार

Rajaram's election will be played | ‘राजाराम’ची निवडणूक रंगणार

‘राजाराम’ची निवडणूक रंगणार

रमेश पाटील -- कसबा बावडा -आमदार महादेव महाडिक यांचे पुत्र आणि जिल्हा परिषदेचे सदस्य अमल महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश करून कोल्हापूर-दक्षिण विधानसभा मतदारसंघातून गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात शड्डू ठोकल्याने त्याचे पडसाद डिसेंबरमध्ये होणाऱ्या ‘राजाराम’ साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विधानसभेच्या निवडणुकीनंतर सतेज पाटील ‘राजाराम’च्या तयारीला लागतील अशी चर्चा आहे. आॅगस्ट २००९ मध्ये झालेल्या ‘राजाराम’च्या निवडणुकीत आमदार महाडिक यांच्या पॅनेलने ५०० ते ८०० अशा मताधिक्याने जागा जिंकल्या होत्या.
नुकत्याच झालेल्या कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार महाडिक यांनी कारखान्याच्या निवडणुकीची आपल्याला चिंता नाही, अशी टिप्पणी केली होती. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीत पुतणे धनंजय महाडिक यांना मदत करूनही अमल महाडिक भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवित असल्याने सतेज पाटील यांचे कार्यकर्ते आता संतप्त झाले आहेत. केलेली मदत महाडिक विसरले, अशी चर्चा आता सुरू झाली आहे आणि त्यातूनच ‘राजाराम’च्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर सतेज पाटील प्रचंड ताकदीनीशी राजारामच्या निवडणुकीत उतरतील अशी शक्यता आहे.
सन २००९ च्या राजारामच्या निवडणुकीत आमदार महाडिक यांच्या सत्ताधारी पॅनेलच्या विरोधात विनय कोरे, मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील, के. पी. पाटील, माजी खासदार निवेदिता माने असे दिग्गज नेते होते. मात्र, त्यांचा निसटता पराभव झाला. या निवडणुकीत संस्था प्रतिनिधी गटातून आमदार महादेवराव महाडिक, तर उत्पादक गट क्र. २ मधून त्यांचे चिरंजीव अमल महाडिक हे दोघे विजयी झाले होते. दरम्यान, या निवडणुका जूनमध्ये होतील, असे समजून सत्तारूढ महाडिक गटाने मोर्चेबांधणी केली होती. मात्र, निवडणुका सहकार प्राधिकरणाची नियुक्ती वेळेत झाली नसल्यामुळे तसेच विधानसभा आॅक्टोबरमध्ये जाहीर झाल्याने पुढे सरकल्या. आता त्या डिसेंबरमध्ये होणार आहेत.
यापूर्वीच्या निवडणुका
आमदार महाडिक यांनी एकतर्फी जिंकल्या होत्या. २००९ ची निवडणूक महाडिक यांना काहीशी जड गेली होती. कारण विरोधी गटाची धुरा मंत्री सतेज पाटील यांच्याकडे होती. आता तर अमल महाडिक विरोधात उभारल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी मंत्री पाटील आपली सर्व ताकद लावल्याशिवाय गप्प बसणार नाहीत,
असे बोलले जाते. त्यामुळे ‘राजाराम’च्या आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत कधी झाली नसेल अशी ‘रंगत’ येत्या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे, मात्र निश्चित...!

१२२ गावांत कार्यक्षेत्र
सध्या राजारामचे १५ हजार ८५२ सभासद आहेत. त्यापैकी अनुउत्पादक संस्था सभासद १३६ आहेत. करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, हातकणंगले, राधानगरी, कागल अशा सात तालुक्यांतील १२२ गावांत कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार करताना सर्वांचीच दमछाक होते.

Web Title: Rajaram's election will be played

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.