‘राजाराम’साठी मोर्चेबांधणी सुरू

By Admin | Updated: October 28, 2014 00:19 IST2014-10-27T23:55:12+5:302014-10-28T00:19:45+5:30

निवडणूक हालचाली गतिमान : सत्तारूढ गटाचा गावनिहाय संपर्क

For the 'Rajaram' front, | ‘राजाराम’साठी मोर्चेबांधणी सुरू

‘राजाराम’साठी मोर्चेबांधणी सुरू


रमेश पाटील - कसबा बावडा -येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. सत्तारूढ गटाने गावनिहाय संपर्क मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्याने आमदार महादेवराव महाडिक यांनी आपले लक्ष्य पुन्हा राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे केंद्रित केले आहे.
नुकत्याच झालेल्या कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार महाडिक यांनी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कारखान्याच्या निवडणुका होतील, असे म्हटले होते; परंतु अद्याप कारखान्याला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कच्च्या-पक्क्या याद्या तयार करण्याच्या सूचना मिळालेल्या नाहीत. नोव्हेंबरमध्ये अशा सूचना मिळाल्यास फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये कारखान्याच्या निवडणुका होऊ शकतात. दरम्यान, निवडणूक केव्हाही होऊ दे. आपण आपले सावध असलेले बरे, या हेतूने सत्तारूढ गटाकडून गावनिहाय संपर्क मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. ‘राजाराम’चे १२२ गावांत कार्यक्षेत्र आहे. करवीर तालुक्यातील ३०, पन्हाळा तालुक्यातील १८, शाहूवाडीतील १०, गगनबावडा १४, हातकणंगले ३२, राधानगरी १४ व कागल तालुक्यातील फक्तचार गावांचा समावेश आहे. कारखान्याचे एकूण १५ हजार ८५२ सभासद आहेत. त्यापैकी अनुउत्पादक संस्था सभासद १३६ आहेत. करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, हातकणंगले, राधानगरी, कागल अशा सात तालुक्यांत कार्यक्षेत्र असल्यामुळे निवडणुकीचा प्रचार दौरा करताना सर्वांचीच दमछाक होते.

Web Title: For the 'Rajaram' front,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.