राजाराम बंधारा पाण्याखाली
By Admin | Updated: July 3, 2016 00:37 IST2016-07-03T00:37:48+5:302016-07-03T00:37:48+5:30
नद्यांचे पाणी वाढले : गगनबावडा, शाहूवाडीसह धरणक्षेत्रांत अतिवृष्टी

राजाराम बंधारा पाण्याखाली
कोल्हापूर/कसबा बावडा : कोल्हापूर शहरात शनिवारी दिवसभर उघडझाप राहिली असली तरी सायंकाळनंतर पावसाची रिपरिप सुरू झाली. गगनबावडा, शाहूवाडीसह सर्वच धरणक्षेत्रांत अतिवृष्टी झाल्याने नद्यांच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. पंचगंगेची पातळी १७ फुटांच्या वर गेल्याने नदीवरील राजाराम बंधारा यंदा पहिल्यांदाच पाण्याखाली गेला आहे.
गेले दोन दिवस कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सकाळी
नऊ-दहानंतर पाऊस विश्रांती घेत आहे. दुपारी चारनंतर हळूहळू पावसास सुरुवात होऊन रात्री जोर पकडत असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. हातकणंगले, शिरोळ वगळता उर्वरित तालुक्यांत दमदार पाऊस होत आहे. गगनबावड्यात २४ तासांत ८१.५०, तर शाहूवाडी तालुक्यात ५९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगडमध्येही जोरदार पाऊस झाला. जिल्ह्या २४ तासांत ४२७.६० मि.मी. पाऊस झाल्याने लहान-मोठ्या नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. राजाराम बंधाऱ्याचे बरगे दरवर्षी जूनच्या
१ तारखेला काढले जातात. यंदामात्र नदीतच पाणी नसल्यामुळे याकामी थोडा विलंब करण्यात आला होता. सध्या बंधाऱ्याचे सर्वच बरगे काढण्यात आल्यामुळे नदीपात्राच्या खालील बाजूस मोठ्या प्रमाणात बंधाऱ्यातून पाणी जात आहे.
दरम्यान, या बंधाऱ्यावर पाणी आलेले असतानाही काही मोटारसायकलस्वार या पाण्यातून बंधारा पार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सकाळच्या वेळचे चित्र होते. नंतर मात्र पाणीपातळी वाढत जाईल तशी या मार्गावरील ये-जा बंद झाली. तसेच पाणी पात्राबाहेर पसरू लागल्याने घाटाचा बराचसा भाग पाण्याखाली गेला आहे. बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे या मार्गावरून औद्योगिक वसाहतीकडे दररोज कामानिमित्त ये-जा करणाऱ्यांना आता शिवाजी पूलमार्गी लांबच्या पल्ल्याने जावे लागणार आहे. बंधाऱ्याजवळील नदीपात्रातील मंदिराचा कळसही आता दिसायचा बंद झाला आहे. धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असून, सर्वाधिक पाऊस कोदे
लघू पाटबंधारे विभागात १७२, तर पाटगाव धरणक्षेत्रात तब्बल १६२ मि.मी. झाला. (प्रतिनिधी)
नृसिंहवाडीत कृष्णा-पंचगंगेच्या पाणीपातळीत सहा फुटांने वाढ
४श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत सहा फुटांने वाढ झाली आहे.
४कृष्णा-पंचगंगा संगमामध्ये असलेल्या संगमेश्वर मंदिराला पाण्याचा वेढा पडला आहे.
४कोल्हापूर, सांगली, सातारा, राधानगरी,
गगनबावडा, आदी ठिकाणी पावसाने हजेरी
लावल्याने कोयना, वारणा, पंचगंगा नद्यांचे पाणी येथील नदीपात्रात दाखल होत असून, गेल्या
२४ तासांत कृष्णा-पंचगंगा नदीच्या संगमाजवळ नद्यांच्या पाणीपातळीत सहा फुटांने वाढ झाली
आहे.
४कृष्णा नदीपेक्षा पंचगंगा नदीतून येणारा पाण्याचा प्रवाह जोरात आहे. नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने शेतकरी वर्ग देखील आनंदात आहे.
२४ तासांत २ टी. एम. सी. वाढ !
राधानगरी, दूधगंगा, पाटगाव या प्रमुख धरणक्षेत्रांत धुवाधार पाऊस सुरू असल्याने पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. चोवीस तासांत जलाशयांत तब्बल दोन टी. एम.सी. पाणी वाढले आहे.
तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा -
करवीर- १७.०९, कागल- २६.६०, पन्हाळा- २९.२८, शाहूवाडी- ५९, हातकणंगले- ३.७५, शिरोळ- ३.४२, राधानगरी- ४७, गगनबावडा- ८१.५०, भुदरगड- ४४.२०, गडहिंग्लज- २५.८५, आजरा- ४८.२५, चंदगड- ४१.६६.