आरोपीच्या नातेवाइकांची महिलाश्रमात उठाठेव
By Admin | Updated: August 5, 2014 23:41 IST2014-08-05T21:06:55+5:302014-08-05T23:41:50+5:30
वर्षा देशपांडे : कऱ्हाड येथील प्रकाराबाबत नाराजी

आरोपीच्या नातेवाइकांची महिलाश्रमात उठाठेव
सातारा : ‘कऱ्हाड येथील महिलाश्रमात आरोपीच्या नातेवाइकांची उठाठेव ठेवली जात आहे,’ असा आरोप अॅड. वर्षा देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत केला. अॅड. देशपांडे म्हणाल्या, ‘खंडाळ्यातील एका विद्यालयातील शिक्षक भरत बापूराव पाटील (रा. अंबवडे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) यालाअल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून, न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला कोठडीही झाली आहे. पीडित मुलीला कऱ्हाड येथील महिलाश्रमात ठेवण्यात आले आहे. मात्र, या आश्रमात आरोपी शिक्षकाचे नातेवाईक या महिलाश्रमात येऊन मुलीला भेटत आहेत. वास्तविक, आरोपींच्या नातेवाइकांकडून पीडित मुलीवर दबाव आणला जाऊ शकतो. या आश्रमातील प्रशासनच आरोपीच्या नातेवाइकांना ही मुभा देत आहेत.’ दरम्यान, जिल्ह्याच्या ठिकाणी महिलाश्रम असणे आवश्यक असल्याची मागणी वीस वर्षांपासून प्रलंबित आहे. राष्ट्रवादीच्या सहा पालकमंत्र्यांकडे मागणी करूनही जागा उपलब्ध नसल्याचे कारण दिले जात आहे. बालसुधारगृहात मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध असतानाही दुर्लक्ष केले जात असल्याचे अॅड. देशपांडे म्हणाल्या. तसेच महिलाश्रमात शंभर टक्के महिला कर्मचाऱ्यांची भरती केली जावी, अशीही मागणी आहे. तरच महिला सुरक्षित राहू शकतील.(प्रतिनिधी)