बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठवा
By Admin | Updated: December 22, 2015 00:53 IST2015-12-22T00:38:38+5:302015-12-22T00:53:03+5:30
कणेगाव येथे महामार्ग रोखला : शर्यत बचाव कृती समितीचे आंदोलन

बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठवा
किणी : प्राणीमित्र संघटनेच्या मागणीनुसार घातलेल्या बैलगाडी शर्यतींवरील बंदी तत्काळ उठवावी, या मागणीसाठी कणेगाव (जि. सांगली) येथे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
२0११ मध्ये प्राणीमित्र संघटनेच्या मागणीनुसार बैलगाडी शर्यतींवर बंदी घालण्यात आली आहे. ती उठविण्याची मागणी शेतकरी वारंवार करीत आहेत. यासाठी अनेक ठिकाणी विविध आंदोलने केली. मात्र, शासनाने ही बंदी उठविली नाही. हा केंद्र शासनाच्या आखत्यारीतील विषय असल्याने चालू अधिवेशनात कायदा करून शर्यती पूर्ववत सुरू करण्यासाठी महामार्गावर रास्ता रोको केला.
शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, अखिल भारतीय शेतकरी शर्यत बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रसाद धर्माधिकारी, महाराष्ट्र रेंसिंग असोसिएशन तर्फे बैलगाड्यांसह शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून धरून घोषणाबाजी केली.
सुरुवातीला हे आंदोलन किणी येथे होणार होते, तशी घोषणाही केली. मात्र, पूर्वानुभव पाहता आंदोलन कुठेही होईल, असे गृहित धरून कोल्हापूर व सांगली पोलीस दलात दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलकांनी पोलिसांशी चर्चा करून कणेगाव (जि. सांगली) येथे शांततेत आंदोलन केले. या आंदोलनासाठी कोल्हापूरचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक चैतन्य एस. व सांगलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह जलद कृती दलाचे सुमारे अडीचशेहून अधिक पोलीसांचा ताफा येथील बंदोबस्तासाठी तैनात केले होते.
शेतकऱ्यांचा इशारा : चार जिल्ह्यांचा सहभाग
या आंदोलनासाठी सांगली, कोल्हापूर, साताऱ्यासह बेळगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाने बंदी उठविली नाही, तर पुढील काळात आंदोलन तीव्र करू, असा इशारा जेष्ठ नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला.