वीकेंड लॉकडाऊनचा पहिला दिवस पावसाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:16 IST2021-06-20T04:16:59+5:302021-06-20T04:16:59+5:30
कोल्हापूर : वीकेंड लॉकडाऊनअंतर्गत निर्बंध कडक असल्याने घराबाहेर पडू नका, असे पोलीस प्रशासनाने किती घसा ओरडून सांगितले तरी ...

वीकेंड लॉकडाऊनचा पहिला दिवस पावसाचा
कोल्हापूर : वीकेंड लॉकडाऊनअंतर्गत निर्बंध कडक असल्याने घराबाहेर पडू नका, असे पोलीस प्रशासनाने किती घसा ओरडून सांगितले तरी न ऐकणाऱ्या कोल्हापूरकरांना मात्र पहिल्या दिवशी पावसाने बऱ्यापैकी नागरिकांना घरात बसवले. तरीदेखील पाऊस थांबल्याची संधी साधत लोक रस्त्यावर येत होते. पोलीसही रस्त्यावर नसल्याने नागरिक बिनधास्तपणे वावरत होते.
पॉझिटिव्हिटीचा दर कमी होत नसल्याने जिल्हाधिकारी आणखी आठवडाभरासाठी लॉकडाऊनचे निर्बंध वाढवले आहेत. ७ ते ४ या वेळेत खरेदीची मुभा दिली आहे, पण आठवड्याच्या शेवटी गर्दी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर गेल्या आठवड्यापासून शनिवार व रविवार असा दोन दिवस कडक वीकेंड लॉकडाऊन पाळला जात आहे. फक्त जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवांनाच या दिवशी मुभा दिली आहे. दुसऱ्या आठवड्यातील वीकेंड लॉकडाऊनचा हा पहिला शनिवार होता. गेल्या आठवड्यात फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. शनिवारीदेखील याचीच पुनरावृत्ती झाली.
सकाळपासून लोकांची रस्त्यावर खरेदीसाठी गर्दी होती. सकाळी काही वेळ पाऊस उघडला, पण नंतर दुपारपर्यंत जाेरदार बॅटिंग सुरू राहिल्याने लोक बऱ्यापैकी घरात अडकले. पण जरासे ऊन पडले की लोक लगेच धाव घेत होते, त्यामुळे रस्त्यांवर नेहमीप्रमाणे वर्दळ दिसत होती. सकाळपासून भाजी विक्रीसह फेरीवाल्यांचीही गर्दी रस्त्यांवर कायम होती. विशेषत: पावसाळी खरेदीसाठीच्या दुकानांमध्ये लोकांची गर्दी जास्त होती.
चौकट
नाक्यावर पोलिसांकडून तपासणी
एरव्ही चार दिवस लॉकडाऊन असलातरी नाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त फारसा नसतो. अपवादात्मक दिवशीच पोलीस नागरिकांची तपासणी करताना दिसतात. शनिवारी मात्र वीकेंड लॉकडाऊनला पोलीस नाक्यावर थांबून असल्याचे दिसत होते. उजळाईवाडील येथील नाक्यावर पोलीस चक्क तपासणी करताना दिसत होते. त्यामुळे लॉकडाऊन असल्याची किमान आठवण राहत होती. पुन्हा शहरात आल्यावर कुठेही पोलिसांचा पहारा दिसत नव्हता. लोकही बिनधास्तपणे रस्त्यावरून ये-जा करताना दिसत होेते.