धुवाधार पाऊस; पंचगंगेच्या पातळीत वाढ
By Admin | Updated: July 27, 2015 00:43 IST2015-07-27T00:38:46+5:302015-07-27T00:43:36+5:30
गगनबावड्यात अतिवृष्टी : पंचगंगा, भोगावती व कासारी नद्यांवरील बारा बंधारे पाण्याखाली

धुवाधार पाऊस; पंचगंगेच्या पातळीत वाढ
कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी दुपारपासून पावसाचा जोर वाढला आहे. गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पंचगंगेची पातळी २२ फुटांपर्यंत पोहोचली आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर आज, सोमवारी सकाळपर्यंत पंचगंगा दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडू शकते. पंचगंगा, भोगावती व कासारी नद्यांवरील बारा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. रविवारी सकाळपासून पावसाची रिपरिप राहिली. दुपारी बारानंतर त्याने काहीशी विश्रांती घेऊन दुपारी अडीचनंतर पुन्हा दमदार सुरुवात केली. दुपारी चार ते सायंकाळी सहापर्यंत पावसाने एकसारखे झोडपल्याने शहरातील रस्त्यांवर पाणीच पाणी दिसत होते. सुटीचा दिवस असल्याने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची पावसात तारांबळ उडाली. ग्रामीण भागातही दमदार पाऊस सुरू आहे. गगनबावडा तालुक्यात चोवीस तासांत ६७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असून राधानगरी धरणक्षेत्रात ८०, वारणा परिसरात २५, कासारी धरणक्षेत्रात ७०, तर कुंभी धरणक्षेत्रात १३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी धरण ६२ टक्के, वारणा ८१, तर दूधगंगा ५२ टक्के भरले आहे. वारणा धरणातून प्रतिसेकंद ८१५ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. भोगावती, कुंभी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पसरले असून, पंचगंगेची पातळी सायंकाळी सातपर्यंत २२ फुटांपर्यंत पोहोचली होती. रात्रभर असाच पाऊस राहिला तर आज, सोमवारी सकाळपर्यंत पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडण्याची शक्यता आहे.
शिरोळ,
तेरवाड बंधारा पाण्याखाली
कुरुंदवाड : पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पंचगंगेचे पाणी यंदा दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले आहे. त्यामुळे तालुक्यातील तेरवाड, शिरोळ बंधारा पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, तालुक्यात पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
जुलै महिना संपला तरी अद्याप पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी हवालदिल आहे. सोयाबीन, भुईमूग, फळभाज्यांसह इतर पिकांची वाढ खुंटली आहे. गेल्या चार दिवसांपासून वातावरणात फरक पडून ढगाळ वातावरण झाले असले तरी अद्याप पावसाचा पत्ता नाही. मात्र, धरण क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून पाऊस होत असल्याने पाण्याचा विसर्ग होत असल्याने पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे. त्यामुळे या नदीवरील तेरवाड व शिरोळ बंधारे पाण्याखाली गेले असून, या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. (वार्ताहर)