पावसाची उघडझाप, पंचगंगा नदीला पूर

By Admin | Updated: July 31, 2014 23:30 IST2014-07-31T23:05:23+5:302014-07-31T23:30:21+5:30

दोन दिवसांत दोन बळी : ८२ बंधारे, ३० प्रमुख रस्ते पाण्याखाली

Rainfall of rain, Panchganga river floods | पावसाची उघडझाप, पंचगंगा नदीला पूर

पावसाची उघडझाप, पंचगंगा नदीला पूर

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोर धरलेल्या पावसाने आज, गुरुवारी काहीअंशी ओढ दिली. दोन दिवसांत धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे पंचगंगा नदीला पूर आला असून, यंदा दुसऱ्यांदा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. नद्या, नाले, ओढ्यांना पूर आल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील ८२ बंधारे, तर ३० प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले आहेत. गेल्या दोन दिवसांत २ व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने यंदाच्या पावसाने बळी घेतलेल्यांची संख्या आता तीनवर पोहोचली आहे. आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ७८.३४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
आज दिवसभरात जिल्ह्यात सर्वत्र पावसाची उघडझाप सुरू होती; परंतु, मागच्या दोन दिवसांत झालेल्या जोरदार पावसाचे पाणी आता नदीतून पुढे सरकत असल्याने पंचगंगा नदीला पुन्हा एकदा पूर आला आहे. कोल्हापुरातील राजाराम बंधारा येथे दुपारी दोन वाजता पंचगंगा नदीची पातळी ३३ फूट ८ इंच इतकी मोजली गेली. हीच पातळी बुधवारी २७.७ फूट इतकी होती. २४ तासांत ही पातळी तब्बल सहा फुटांनी वाढली.
कोकणातील वाहतूक अन्य मार्गाने
जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांना पूर आलेले असल्याने त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झाला आहे. कोल्हापूरहून गगनबावडामार्गे कोकणात जाणारी वाहतूक आज वळविण्यात आली. गगनबावडा रस्त्यावरील शेणवी, मांडुकली, लोंगे या तीन गावांतील रस्त्यावर पाणी आल्याने कोकणातील वाहतूक अन्य मार्गांवरून वळविण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Rainfall of rain, Panchganga river floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.