पावसाची उघडझाप
By Admin | Updated: June 26, 2016 00:54 IST2016-06-26T00:54:43+5:302016-06-26T00:54:43+5:30
नद्यांच्या पातळीत वाढ : गगनबावड्यात सर्वाधिक पाऊस

पावसाची उघडझाप
कोल्हापूर : जिल्ह्यात शनिवारी दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात २६ मिलिमीटर झाला. धरणक्षेत्रात अजून अपेक्षित दमदार पाऊस होत नसून नद्यांच्या पातळीत थोडी वाढ झाली आहे. जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी ३३७.७९ मिलिमीटर पाऊस होतो, यंदा आतापर्यंत केवळ ११०.९७ मिलिमीटर (३२.८५ टक्के) पाऊस झाला आहे.
मान्सूनने आगमन केले असले तरी अजूनही त्याला ताकद लागलेली नाही. शनिवारी दिवसभर जिल्ह्यात उघडझापच राहिली. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत राहिल्या. धरणक्षेत्रातही पाऊस नसल्याने पाणीपातळीत वाढ होत नाही. राधानगरी धरणक्षेत्रात १६, वारणा परिसरात २, दूधगंगा धरण क्षेत्रात ५, तर कासारी परिसरात २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी, वारणा, दूधगंगा धरणांचा पाणीसाठा ‘जैसे थे’ असून कुंभी, घटप्रभा, चिकोत्राच्या पाणीसाठ्यात थोडी वाढ झाली आहे.
शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ४.३१ मिलिमीटर पाऊस झाला असून, गगनबावडा व चंदगड तालुक्यांत चांगला पाऊस झाला. नद्यांच्या पातळीत किंचित वाढ झाली असून, पंचगंगा नदीपातळीत एक फुटाने वाढ झाली आहे. राजाराम बंधाऱ्यातून होणाऱ्या विसर्गात प्रतिसेकंद २५० घनफुटांनी वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)