ग्राहक संपर्क अभियानामध्ये कागलला ‘तक्रारीं’चा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 22:59 IST2017-07-18T22:59:52+5:302017-07-18T22:59:52+5:30

महावितरण विभाग : तोंडी उत्तरे देण्याचा प्रयत्न

Rainfall of 'Complaints' in the customer contact campaign | ग्राहक संपर्क अभियानामध्ये कागलला ‘तक्रारीं’चा पाऊस

ग्राहक संपर्क अभियानामध्ये कागलला ‘तक्रारीं’चा पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क --कागल : महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीच्या येथील उपविभागीय कार्यालयात फारशी कोणाला माहिती न देता आयोजित केलेल्या ग्राहक संपर्क अभियानात ग्राहकांनी वेगवेगळ्या तक्रारींचा ‘पाऊस’ पाडला. या कार्यालयाच्या भोंगळ कारभारावर पांधरुण घालण्यासाठी अधिकाऱ्यांनी अनेकांच्या तक्रारींना तोंडी उत्तरे देत तक्रारींची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला. तरीही तब्बल ४९ लेखी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
शनिवारी (दि. १५) हे ग्राहक संपर्क अभियान कार्यालयात घेण्यात आले होते. याबद्दल फारशी कोणाला माहिती नव्हती. तरीसुद्धा मोठी गर्दी झाली होती. वाढीव बिले आणि वेळेत बिले मिळत नाहीत, चुकीच्या पद्धतीने बिल आकारणी, नवीन वीज कनेक्शन मागणी करून वर्षभर झाले तरी दखल घेतली जात नाही. धोकादायक पोल, लोंबकळणाऱ्या तारा बदलण्याबद्दल दिलेली निवेदने, अनेक ठिकाणी उघड्यावर असलेल्या डी. पी., घरांच्या छतावरून गेलेल्या विद्युत तारा, नवीन कृषिपंप कनेक्शन, खराब मीटर आणि त्यामुळे येणारी वाढीव बिले, यांसह स्थानिक वायरमन, सहायक यांच्याबाबतही काही तक्रारी करण्यात आल्या. विजेच्या समस्येबाबत संपर्क साधल्यास दखल घेतली जात नाही. कार्यालयीन वेळेत कर्मचारी हजर राहत नाहीत. ग्राहकांना ताटकळत ठेवले जाते, असे आरोपही ग्राहकांनी केले. उपकार्यकारी अभियंता गणेश पोवार, लिपिक डी. के. हंकारे यांनी या तक्रारी नोंदवून घेतल्या. गणेश पोवार यांनी ग्राहकांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. काही तक्रारी तोंडी स्वरूपात ऐकूण घेतल्या. तर ठराविक तक्रारी लेखी घेऊन त्यांना पोहोच देण्यात आली.

तक्रारी वरिष्ठ पातळीवर पाठविल्या : गणेश पोवार
उपकार्यकारी अभियंता पोवार यांनी २२ तक्रारींचा तांत्रिक स्वरूपाच्या, तर वीज बिलाबद्दल २७ तक्रारी आल्याचे सांगितले. दर महिन्याला येणाऱ्या बिलामध्ये होत चाललेली मोठी वाढ आणि भारनियमन नसताना वारंवार विद्युतपुरवठा खंडित होणे, शेतामध्ये विद्युततारा पडून उभी पिके जळणे, अशा तक्रारींचा पाढा यावेळी ग्राहकांनी वाचला. सर्व तक्रारींची नोंद करून वरिष्ठ पातळीवर पाठविल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Web Title: Rainfall of 'Complaints' in the customer contact campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.