पाऊस गाण्यांनी मने ओलावली
By Admin | Updated: July 23, 2015 00:12 IST2015-07-22T23:42:24+5:302015-07-23T00:12:14+5:30
‘घन ओथंबून येती’ : सांगितीक मैफलीत मराठी, हिंदी गाण्यांची बरसात

पाऊस गाण्यांनी मने ओलावली
कोल्हापूर : मनाला प्रफुल्लित करणाऱ्या पावसाळ्यात रसिकांच्या प्रतिसादाला ओ देत गंधार प्रस्तुत ‘घन ओथंबून येती’ या बुधवारी सायंकाळी शाहू स्मारक भवन येथे झालेल्या सांगितीक मैफलीत नव्या-जुन्या मराठी व हिंदी पावसाच्या गाण्यांत रसिक ओले चिंब झाले. कार्यक्रमाची सुरुवात ‘घनन घनन’ या समूहगीताने झाली. ‘श्रावणात घन निळा’ या पूजा पाटील यांनी गायलेल्या गाण्याने तर रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. तुषार पाटील यांच्या ‘भेट तुझी माझी स्मरते’ आणि ‘कधी तू’ या प्रल्हाद जाधव यांच्या गायनाने रसिकांना डोलायला लावले. निशांत गोंधळी यांच्या ‘वासाचा पयला’, तर ‘नभ उतरू आलं’ या प्रत्यंचा राजाज्ञा यांच्या गाण्याने तर एक उंची गाठली. अखंड दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या या कार्यक्रमात बाहेर पडत असलेल्या हलक्याशा पावसाचा फील निशांत गोंधळी यांच्या ‘गारवा’ या गाण्याने सभागृहातही आणला. पूजा पाटील यांनी ‘ढग दाटूनी येतात’ हे गीत सादर करीत रसिकांच्या अपेक्षा आणखी वाढविल्या. उत्तरोत्तर रंगत चाललेल्या या कार्यक्रमात प्रत्यंचा राजाज्ञा यांच्या ‘राया मला पावसात’ या गाण्याने तर कार्यक्रमाची उंची आणखी वाढविली. ‘नाच रे मोरा’, ‘भिजून गेला वारा’ या प्रल्हाद आणि पूजा यांंनी गायलेल्या, तर ‘चिंब पावसानं’ या निशांत, पूजा यांनी गायलेल्या गाण्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली. प्रल्हाद जाधव यांनी ‘रिमझिम गिरे सावन’ हे हिंदी गीत गायले. अखेरच्या टप्प्यात ‘भरलं आभाळ’, ‘चिंब भिजलेले’, ‘मेघा रे... मेघा रे...’ या गाण्यांनी तर रसिकांना आणखी खुर्चीला खिळवून ठेवले. कार्यक्रमाची सांगता प्रल्हाद जाधव यांच्या ‘वो कागज की कश्ती’ या गीताने झाली.
या कार्यक्रमात संदेश खेडेकर (तबला), नरेंद्र पाटील (आॅक्टोपॅड), गुरू ढोले (ढोलकी), शिवाजी सुतार (सिंथेसायझर), केदार गुळवणी (व्हायोलियन), भूषण साठम (गिटार) यांनी साथ दिली. रोहिणी वाघमोडे व निशांत गोंधळी यांनी बहारदार निवेदन केले. (प्रतिनिधी)