३६ कोटींच्या रस्त्यांच्या कामात पावसाचे विघ्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:30 IST2021-09-17T04:30:00+5:302021-09-17T04:30:00+5:30
कोल्हापूर : कामास निधी आहे, कार्यारंभ आदेशही झालेत; पण अधून मधून कोसळणारा पाऊस महापालिका प्रशासनास काही करू देईना. त्यामुळे ...

३६ कोटींच्या रस्त्यांच्या कामात पावसाचे विघ्न
कोल्हापूर : कामास निधी आहे, कार्यारंभ आदेशही झालेत; पण अधून मधून कोसळणारा पाऊस महापालिका प्रशासनास काही करू देईना. त्यामुळे पाऊस उघडण्याची आणि सध्याचे रस्ते पूर्ण वाळण्याची प्रशासनाला प्रतीक्षा लागून राहिली आहे. सुमारे ३६ कोटी रुपये खर्च करून शहरातील खराब रस्ते नव्याने करण्याच्या तसेच पॅचवर्कच्या कामास दि. २० सप्टेंबरनंतर सर्वाधिक प्राधान्य देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगण्यात आले.
कोल्हापूर शहरात गेल्या तीन वर्षात अतिवृष्टी झाली. दोन वर्षे महापूर आला. आयआरबी कंपनीने केलेले रस्ते तसे अजूनही चांगले आहेत; परंतु महापालिका प्रशासनाने शासकीय, जिल्हा नियोजन मंडळ तसेच स्वनिधीतून केलेले शहरातील अनेक भागातील रस्ते गेल्या तीन वर्षात खराब झाले आहेत. त्यामुळे हे रस्ते पूर्णत: नव्याने करणे आवश्यक आहे.
शहरातील खराब रस्ते करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मागच्या सहा-सात महिन्यात जवळपास ३९ कोटींचा निधी शासनाकडून आणला आहे. त्यातील ३६ कोटींच्या रस्त्यांची निविदा प्रक्रिया राबवून संबंधित ठेकेदारांना कार्यारंभ आदेशसुद्धा दिले आहेत. कार्यारंभ आदेश दिले आणि पावसाळा सुरू झाला. त्यामुळे ही कामे पावसाळा उघडल्यानंतर करण्याचा निर्णय ठेकेदार व महापालिका प्रशासन यांनी घेतला.
जिल्ह्यासह शहरात यंदा अतिवृष्टी झाली. महापूर आला. त्यामुळे रस्ते अधिकच खराब झाले आहे. गेल्या दोन दिवसापासून पाऊस उघडल्यानंतर खराब रस्त्यांचे दर्शन शहरवासीयांना होत आहे. पालकमंत्री यांनी आणलेल्या निधीतून खराब रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. डांबरी पॅचवर्कसुद्धा काही ठिकाणी केली जाणार आहेत. परंतु पाऊस अजून पूर्णपणे उघडलेला नाही. नवीन रस्ते करण्यासाठी आता पाऊस उघडण्याची प्रतीक्षा आहे. पाऊस उघडून कडक ऊन पडल्यावर रस्ते चांगले वाळले की कामाला सुरुवात होईल असे सांगण्यात येते.
कोट -
निधी उपलब्ध आहे. कार्यारंभ आदेश झाले आहेत. पाऊस असल्यामुळे ही कामे करता आली नाहीत. परंतु सार्वजनिक गणेश विसर्जन झाल्यानंतर नवीन रस्त्यांची कामे करण्यास प्राधान्य दिले जाईल. किमान या महिन्याअखेर कामे सुरू होतील.
डॉ. कादंबरी बलकवडे, प्रशासक
१६९ कोटींच्या रस्त्यांचे प्रस्ताव तयार -
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार शहरातील मोठे रस्ते करण्यासाठी १६९ कोटी रुपयांचे आराखडे तयार झाले आहेत. लवकरच याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला जाईल. या रस्त्यांना तत्त्वतः मान्यता झाली आहे. तांत्रिक मान्यता झाली की निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात किती निधी मंजूर होतो हे पाहून प्राधान्यक्रमाने रस्ते केले जातील, असे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले.