शहरात पाऊस पुन्हा ‘सैराट’!

By Admin | Updated: June 10, 2016 00:49 IST2016-06-10T00:49:08+5:302016-06-10T00:49:27+5:30

रस्त्यावर लोट : नागरिकांची त्रेधातिरपीट; ‘सेफ सिटी’चा धुव्वा; पहिल्या पावसातच स्वच्छतेचे वाजले तीनतेरा

Rain again in the city! | शहरात पाऊस पुन्हा ‘सैराट’!

शहरात पाऊस पुन्हा ‘सैराट’!

कोल्हापूर : शहरात गुरुवारी रात्री आठनंतर पाऊस पुन्हा सैराट झाला. बुधवारी (दि. ८) सायंकाळप्रमाणेच शहरवासीयांची त्रेधातिरपीट उडाली. या मान्सूनपूर्व पावसाने दिवसभर कार्यालयात काम करून घरी परतणाऱ्या लोकांची चांगलीच पंचाईत केली.
बुधवारी सायंकाळी कोल्हापूरसह जिल्ह्यालाही पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. त्यामुळे हाच पाऊस तसाच सुरू राहतो की काय असे वाटत होते; परंतु गुरुवारी सकाळी आभाळ स्वच्छ होते. दिवसभर पावसाची कोणतीही चाहूल नव्हती. फक्त उकाडा जाणवत होता.
आता पावसाळा सुरू झाला म्हणून लोकांनी पावसाळ्यातील डागडुजीचीही कामे करून घेतली. आता दोन-तीन दिवस पाऊस येणार नाही, असे वाटत असतानाच रात्री आठनंतर पुन्हा आभाळ भरून आले व जोरदार पावसाला सुरुवात झाली.
त्यामुळे रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहत होते. त्यातूनच वाहतूक सुरू राहिली. रेनकोटशिवाय बाहेर पडलेल्या लोकांना चिंब भिजूनच घरी परतावे लागले. पावसामुळे रात्री हवा मात्र थंडगार झाली.
शहरातील गटारींतील पाणी नाल्यांद्वारे वाहून जाते; परंतु अनेक ठिकाणचे नाले बांधकाम व्यावसायिकांनी वळविले आहेत. बसंत-बहार टॉकीजजवळचा नाला असाच स्थानिक बिल्डरने वळविला. टेंबलाईवाडी येथील नाला ‘आयआरबी’ने वळविला. अशा घटना घडल्यावर त्याबद्दल महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या; परंतु तेथील यंत्रणेने त्यांची दखल न घेतल्यानेच पहिल्या पावसात शहराचे तळे झाल्याची तक्रार प्रजासत्ताक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. हे नाले तातडीने रिकामे करून पाण्याचा प्रवाहीपणा सुरू करावा, अशी मागणी देसाई यांनी केली आहे.

Web Title: Rain again in the city!