रायगडला ३० हजार शिवभक्त जाणार
By Admin | Updated: June 3, 2015 01:00 IST2015-06-03T00:45:36+5:302015-06-03T01:00:16+5:30
तयारी पूर्ण : २० हजार जणांची नोंदणी पूर्ण

रायगडला ३० हजार शिवभक्त जाणार
कोल्हापूर : युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४२ वा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर शनिवारी (दि. ६) साजरा होणार आहे. त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्णातून सुमारे ३० हजार शिवभक्त जाणार आहेत. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने सोहळ्याची तयारी पूर्ण केली आहे. आज, बुधवारी अन्नछत्रासाठी १२५ जणांचे पथक रायगडला रवाना होणार आहे.सोहळ्यानिमित्त शुक्रवार (दि. ५) पासून रायगडावर विविध कार्यक्रम होणार आहेत. यात राज्यातील अनेक शिवकालीन युद्धकलाविशारद आपली प्रात्यक्षिके रणहलगी, रणशिंगांच्या निनादात सादर करणार आहेत. त्यासह भव्य पालखी सोहळा, छत्रचामरांसह शिवरायांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी कोल्हापूर जिल्ह्णातून ३० हजार शिवभक्त जाणार आहेत. त्यासाठी गेल्या रविवार (दि. ३१)पर्यंत २० हजार शिवभक्तांनी नोंदणी केली आहे. नोंदणीची प्रक्रिया समितीने थांबविली आहे. अन्नछत्र, प्रवास, गडसजावट, सांस्कृतिक, आदी उपसमितीच्या माध्यमातून सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. आज अन्नछत्रासाठी १२५ जणांचे पथक रवाना होणार आहे. समितीकडे नोंदणी केलेले शिवभक्त उद्या, गुरुवारी रात्री दहा वाजता भवानी मंडपातून, तसेच जिल्ह्णातील अन्य विविध ठिकाणांहून रायगडला रवाना होतील.
सोशल मीडियाद्वारे आवाहन
सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन सोशल मीडियाद्वारे अनेक शिवभक्त करीत आहेत. यात व्हॉटसअप, फेसबुक, हाईक, आदींद्वारे एकच धून... सहा जून... चलो रायगड, शिवराज्याभिषेकाचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज आणि रायगडाच्या छायाचित्रांचा वापर करून आवाहन केले जात असल्याचे अध्यक्ष यादव यांनी सांगितले.
असा होणार सोहळा...
सोहळ्याची सुरुवात शुक्रवारी दुपारी चार वाजता रायगड येथे युवराज संभाजी महाराज यांच्या हस्ते केली जाणार आहे. त्यानंतर ते रायगडाच्या पायथ्यापासून गडचढाई करणार आहेत. त्यांच्यासमवेत गडावर चालत येण्याचा मान शिवभक्तांना मिळणार असल्याचे अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष सागर यादव यांनी सांगितले. ते म्हणाले, शनिवारी पहाटे रायगडावरील नगारखान्यासमोर भव्य भगवा ध्वज उभारण्यात येईल. यावेळी मुख्य राज्याभिषेक सोहळा युवराज संभाजी महाराज यांच्या हस्ते होईल.