सांगलीत फटाके व्यापाऱ्यांवर छापे
By Admin | Updated: May 10, 2015 00:48 IST2015-05-10T00:45:35+5:302015-05-10T00:48:31+5:30
साठ्याची तपासणी : कवठेएकंदमधील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

सांगलीत फटाके व्यापाऱ्यांवर छापे
सांगली : कवठेएकंद (ता. तासगाव) येथील ईगल फायर वर्क्स या फटाके कारखान्यात स्फोट होऊन ११ जणांचा बळी गेल्याने पोलिसांनी शनिवारी गणपती पेठ व चांदणी चौकातील तीन फटाके व्यापाऱ्यांच्या दुकानांवर छापे टाकले. दुकानात फटाक्यांचा किती साठा शिल्लक आहे, प्रत्यक्षात साठा करण्यासाठी किती परवानगी आहे, याची माहिती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते, पण कारवाई जोरदार सुरू केली आहे.
सांगलीत परवानाधारक फटाके व्यापाऱ्यांची यादी काढण्यात आली आहे. या प्रत्येक व्यापाऱ्यास त्याला परवाना देताना दुकानात फटाक्यांचा किती साठा ठेवायचा, याची अट घालून दिली आहे. व्यापाऱ्यांनी अटीचे पालन केले आहे का नाही तसेच सुरक्षिततेच्यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी तपासणीचे आदेश दिले होते. पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड विशेष पथकाचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शिंदे, संजयनगर ठाण्याचे रवींद्र डोंगरे, शहर पोलीस ठाण्याचे राजू मोरे यांच्यासह पन्नासहून अधिक पोलिसांच्या पथकाने शनिवारी दुपारी गणपती पेठेतील दोन व चांदणी एक अशा तीन दुकानांवर छापे टाकले. फटाके परवान्याच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यामध्ये फटाक्यांचा किती प्रमाणात तसेच कोणत्या प्रकारचा साठा करण्यास परवानगी आहे, याची चौकशी केली. दुकानात असलेल्या साठ्याची रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती. यामुळे आक्षेपार्ह काही आढळून आले का नाही, याची माहिती मिळू शकली नाही. याशिवाय ज्यांना फटाके विक्रीचा परवाना नाही, अशा काही किरकोळ व्यापारी फटाक्यांची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्याविरुद्धही कारवाई सुरु केली जाणार आहे.
दरम्यान, मिरज, कुपवाडसह संपूण जिल्ह्यातील परवानाधारक फटाके विक्रेत्यांची यादी काढण्याचे आदेश पोलीसप्रमुख सावंत यांनी दिले आहेत. या सर्वांचा फटाके विक्रीचा परवाना व त्यांच्याकडीलही फटाके साठ्याची तपासणी रविवारपासून केली जाणार आहे. पोलिसांनी सुरु केलेल्या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. दरम्यान, कवठेएकंदमध्येही सोमवारपासून पुन्हा तपासणी मोहीम सुरु करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
परवाना रद्द
कवठेएकंदमधील ईगल फायर वर्क्समध्ये झालेल्या स्फोटात ११ जणांचा बळी गेल्याने त्याचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे, असे जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी सांगितले. ते म्हणाले की, कवठेएकंदमध्ये आणखी दोघे परवानाधारक फटाके तयार करण्याचे करखाने आहेत. त्यांचाही परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.