किणी परिसरात लुटारूंचा धुमाकूळ
By Admin | Updated: October 19, 2014 00:44 IST2014-10-19T00:43:34+5:302014-10-19T00:44:52+5:30
दाम्पत्यास मारहाण करून लुटले : गायकवाड मळ्यातही तिघांना मारहाण

किणी परिसरात लुटारूंचा धुमाकूळ
किणी : रात्रीच्या वेळेत शेतात वस्तीस जाणाऱ्या आदम लाड, पत्नी नूरजान लाड यांना जबर मारहाण करून, सोन्याचे मंगळसूत्र, कर्णफुले, तर गायकवाड मळ्यात वस्तीस असणाऱ्या तेजस महाजन व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करून सोन्याची चेन, तीन हजार रुपये, अशा पाऊण लाख रुपयांच्या ऐवजांची अज्ञात चोरट्यांनी लूट केल्याची घटना किणी (ता. हातकणंगले) येथे काल, शुक्रवारी रात्री उशिरा घडली.
किणी-तळसंदे रस्त्यावरून रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आदम लाड व त्यांच्या पत्नी नूरजान शेतावर नेहमीप्रमाणे मोटारसायकलवरून वस्तीस जात होते. दरम्यान, ओढ्याच्या पुलाजवळ दबा धरून बसलेल्या पाच ते सात अज्ञात चोरट्यांनी त्यांना अडवून जबर मारहाण केली व त्यांच्याकडील मोबाईल, मंगळसूत्र, कर्णफुले, चांदीची जोडवी हिसकावून घेऊन पलायन केले. जखमी अवस्थेत असलेल्या आदम लाड यांनी गावामध्ये येऊन युवकांना कल्पना दिली. युवकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, या चोरट्यांनी महामार्गालगत असणाऱ्या गायकवाड मळ्यात वस्तीस असणारे तेजस महाजन, रोहिणी महाजन व विजयमाला परीट यांना मारहाण करून एक तोळ्याची सोन्याची चेन व रोख तीन हजार रुपयांची लूट केली. हा प्रकार सुरू असताना शोध घेणारे तरुण याठिकाणी दाखल होताच चोरटे आणि युवकांच्यात धुमश्चक्री झाली. मात्र, चोरट्यांकडे धारदार शस्त्रे असल्याने ते पळून जाण्यात यशस्वी झाले. किणी-तळसंदे रस्त्यावर आजअखेर तीन ते चारवेळा असा प्रकार घडल्याने गावामध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून, या चोरट्यांचा तत्काळ शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. या चोरट्यांचा तासाहून अधिक काळ धुमाकूळ सुरू होता.