काेल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्यात रविवारी दुपारी कोल्हापुरातील शाहूपुरी येथील एका हॉटेलमध्ये गुफ्तगू रंगले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशासह राधानगरी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांमधील नाराजीवर चर्चा झाल्याचे समजते.दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचा गट लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. राहुल पाटील व राजेश पाटील हे आपल्या गटासोबत चर्चा करत आहेत. करवीरमधील बहुतांशी पदाधिकाऱ्यांची राष्ट्रवादी प्रवेशाला पसंती आहे; पण राधानगरीतील पदाधिकाऱ्यांनी उघड विरोध केल्याने पाटील बंधूंसमोर पेच निर्माण झाला आहे.ए. वाय. पाटील हे ‘भोगावती’च्या सत्तेत राहुल पाटील यांच्यासोबत आहेत. त्यामुळे भूमिका घेताना ‘ए. वाय.’ यांना विश्वासात घेतले पाहिजे, म्हणून त्यांनी रविवारी त्यांची भेट घेऊन चर्चा केली. राधानगरीतील पदाधिकाऱ्यांचा विरोध आणि ‘भोगावती’चे राजकारण यावर चर्चा झाली. याबाबत, राहुल पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो झाला नाही.
अजित पवार, हसन मुश्रीफ ताकद देतीलउपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे तुम्हाला भविष्यातील राजकारणात निश्चितपणे ताकद देतील. त्यामुळे तुम्ही निर्णय घेणार असाल तर हरकत नसल्याचे ए. वाय. पाटील यांनी सांगितल्याचे समजते.‘शेकाप’सह इतरांनाही विश्वासात घ्याकोणताही राजकीय निर्णय घेण्याअगोदर तुमचे पदाधिकारी, कारखान्याचे संचालकांसह शेतकरी कामगार पक्षाला विश्वासात घ्या. ‘भोगावती’ साखर कारखान्याचाही विचार करा, असा सल्ला ए. वाय. पाटील यांनी राहुल पाटील यांना दिल्याचे समजते.