राहुल आवाडेंचा जिल्हा बँकेत आत्महत्येचा प्रयत्न

By Admin | Updated: March 11, 2015 00:10 IST2015-03-10T23:08:21+5:302015-03-11T00:10:55+5:30

कोल्हापुरातील प्रकार : व्याज सवलतीपोटी सहा कोटींची मागणी; धिंगाणा, कर्मचाऱ्यांनी आवाडे कुटुंबीयांना पिटाळले

Rahul Anand tried to commit suicide in District Bank | राहुल आवाडेंचा जिल्हा बँकेत आत्महत्येचा प्रयत्न

राहुल आवाडेंचा जिल्हा बँकेत आत्महत्येचा प्रयत्न

कोल्हापूर : इचलकरंजी येथील इंदिरा महिला सहकारी सूतगिरणीला शासनाच्या व्याज सवलत योजनेतील सहा कोटी द्यावेत, या मागणीसाठी काँग्रेसचे युवा नेते व आॅल इंडिया को-आॅपरेटिव्ह स्पिनिंग मिल फेडरेशनचे उपाध्यक्ष राहुल आवाडे यांनी येथील जिल्हा मध्य. सहकारी बँकेत विषारी गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ‘येथून माझं प्रेतच जाईल, पैशासंबंधी हमीपत्र द्या,’ असे म्हणत त्यांनी धिंगाणा घातला. पोलिसांनी माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे आणि पुत्र राहुल यांना ताब्यात घेतले. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आवाडे यांच्या निषेधाच्या घोषणा देत पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. या सूतगिरणीला जिल्हा बॅँकेने चार कोटी ८३ लाखांचे कर्ज दिले होते. त्यावर दोन कोटी ६३ लाख रुपये व्याज झाले होते. राज्यातील सहकारी सूतगिरण्यांसाठी शासनाच्या व्याज सवलत योजनेत कर्जाची पुनर्रचना केली. त्यात व्याज सवलत देऊन पाच कोटी ४४ लाख रुपये कर्ज राहिले. हे कर्ज दहा वर्षांत आठ हप्त्यांत भरण्याचे सूतगिरणीच्या व्यवस्थापनाने मान्य केले. त्यानुसार नियमित हप्ते भरले आहेत. ६३ लाखांचा एक याप्रमाणे दोन हप्ते भरणे शिल्लक आहेत. ते व्याज सवलतीतून कपात करून घ्यावेत व उर्वरित रक्कम द्यावी, या मागणीसाठी राहुल यांनी यापूर्वी तीनवेळा बँकेत हुज्जत घातली होती. मंगळवारी सकाळी राहुल व सूतगिरणीच्या संचालकांचे शिष्टमंडळ बँकेत आले. तेथे राहुल यांनी चव्हाण यांच्याशी हुज्जत घातली. काही वेळानंतर त्यांनी बाहेर जाऊन कसल्या तरी गोळ्या खाल्ल्या. ‘मी आत्महत्या करणार आहे, व्याजापोटी सहा कोटी रुपये द्यावेत, यापोटी हमीपत्र द्यावे,’ अशी मागणी केली. यावर चव्हाण यांनी ‘बँक तुम्हाला काहीही देणे नाही,’ असे ठणकावून सांगितले. पोलिसांनी राहुल, किशोरी आवाडे यांच्यासह शिष्टमंडळातील सर्व सदस्यांना ताब्यात घेतले.

वर्षात आत्महत्येचा दुसऱ्यांदा प्रयत्न
याच मागणीसाठी राहुल यांनी ३० आॅगस्ट २०१४ रोजी राज्य सहकारी
बॅँकेच्या मुंबई येथील सर्वसाधारण सभेत हाताची नस कापून घेऊन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मंगळवारी जिल्हा बॅँकेत येऊन त्यांनी दुसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: Rahul Anand tried to commit suicide in District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.