अस्तित्वासाठीच रघुनाथदादांची कोल्हेकुई
By Admin | Updated: March 17, 2015 00:07 IST2015-03-16T23:05:55+5:302015-03-17T00:07:01+5:30
जयंत पाटील यांची टीका : राजू शेट्टी यांच्याकडून ऊस दराबाबत निव्वळ सत्तेचे राजकारण

अस्तित्वासाठीच रघुनाथदादांची कोल्हेकुई
शिरटे : स्वत:चे अस्तित्व दाखविण्यासाठी शेतकरी संघटनेचे नेते मी आणि शरद पवार यांच्या नावाने नेहमीच वक्तव्ये करतात़ मी अशा गोष्टींना फारसे महत्त्व देत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आमदार जयंत पाटील यांनी आभार सभेत रघुनाथ पाटील यांना फटकारले़ खा़ शेट्टी पूर्ण अपयशी ठरले आहेत. त्यांनी ऊस दरावर सत्तेचे राजकारण केले आहे, असा आरोपही त्यांनी केला़ आ़ पाटील यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर ही पहिलीच सभा झाली़येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे आभार दौरा व दक्षिण, उत्तर भाग विकास सोसायटीच्या नूतन संचालकांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. माजी खासदार विश्वास पाटील अध्यक्षस्थानी होते. बी. के. पाटील, रवींद्र बर्डे, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, सुनील पोळ, सुनीता वाकळे, जयश्री कदम, सुस्मिता जाधव आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.आ़ पाटील म्हणाले, जेव्हा साखरेला चांगला दर होता, तेव्हा आम्ही कोट्यवधी रूपये शेतकऱ्यांच्या हातात दिले आहेत, दराचे यांनी सांगण्याची गरज नाही. कोणी म्हणते, जयंतराव तीन हजार द्या़ साखर २२५0 ला विकली जात असताना, मी तीन हजार कसे देणार? यांना शेतकऱ्यांच्या हिताचे सोयरसुतक नाही़
खा़ शेट्टींनी मोदी शासनास पाठिंबा दिला़ त्यांनी शेतकरीविरोधी धोरणे थोपवून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायला लावायला हवे होते. मात्र त्यात त्यांना अपयश आले आहे. बारामती, कऱ्हाडला आंदोलन करणाऱ्या या मंडळींनी पुणे आयुक्तालयाच्या काचा फोडून आंदोलनाचा फार्स केला. सरकारसोबत राहून फारसा उपयोग होत नाही, लोकप्रियता घटू लागली म्हटल्यावर हे आता पाठिंबा काढून घेण्याची भाषा करीत आहेत़ तुमचा एकही आमदार नसताना तुम्ही पाठिंबा काय काढून घेणार?
प्रारंभी आ़ पाटील यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सरपंच संजय पाटील यांनी स्वागत केले. राजारामबापू दूध संघाचे संचालक अॅड. संग्राम पाटील यांनी प्रास्ताविक केले. हौसेराव पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर शिवाजीराव पाटील यांनी आभार मानले. यावेळी अजितराव पाटील, ‘कृष्णा’चे उपाध्यक्ष सुरेश पाटील, महिपतराव पाटील, संपतराव पाटील, संजय पाटील, दिलीपराव पाटील, बाबासाहेब पाटील, अविनाश खंडागळे, शहाजी पाटील, भरत पाटील, हणमंत पाटील, प्रकाश रेठरेकर, विश्वास खंडागळे, रणजित पाटील, शशिकांत बेंद्रे, नीलम पाटील, नीता पाटील, अलका माळी, संदीप पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)
सांत्वन, अभिवादन व विचारपूस..!
पाटील यांचे सकाळी गावात आगमन होताच कार्यकर्त्यांनी चिंचेच्या मळ्यात सांत्वनास जायला हवे, असे सांगितले़ तेव्हा कार्यकर्त्यांना सभा सुरू करायला सांगून ते लगेच मोटारसायकलने मळ्याकडे गेले़ परत येताना संभाजी सुतार, शशिकांत पाटील यांच्या घरी हजेरी लावून सांत्वन केले. यानंतर क्रांतिसिंहांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले़ सभास्थळी उपस्थित असलेले वयोवृध्द माजी खासदार विश्वासराव पाटील यांचीही विचारपूस केली.
सर्वांनाच शुभेच्छा..!
दक्षिण व उत्तर भाग सोसायटीच्या नूतन संचालकांचा सत्कार जयंत पाटील यांच्याहस्ते होणार होता. परंतु त्यांनी तो उपस्थित मान्यवरांना करण्यास भाग पाडले. याचा संदर्भ घेत, दोन्ही पॅनेलचे कार्यकर्ते माझेच आहेत, त्यामुळे विजयी झालेल्यांचा सत्कार केला की तो खूष आणि पराभूत नाराज, यापेक्षा ‘दोघांनाही शुभेच्छा’ असे म्हणताच हशा पिकला.
मी सत्कार घेणार नाही..!
माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या गटनेतेपदी माझी निवड झाली आहे. परंतु आबांच्या जागी ही निवड झाल्याने मी सत्कार स्वीकारत नाही. त्यानंतर कार्यकर्त्यांनी गटनेतेपदाचा राहुद्या, आमदारकीला उच्चांकी मतदान घेतल्याबद्दल तरी सत्कार स्वीकारा, असे म्हणत त्यांना सत्कार स्वीकारण्यास भाग पाडले.