पाटील कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी रीघ
By Admin | Updated: April 3, 2015 01:05 IST2015-04-03T00:50:38+5:302015-04-03T01:05:29+5:30
जयसिंगपूर : पृथ्वीराज चव्हाण, चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

पाटील कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी रीघ
जयसिंगपूर : शिरोळचे माजी आमदार सा. रे. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन करण्यासाठी गुरुवारी दिवसभर जयसिंगपूर येथील निवासस्थानी विविध स्तरातील लोकांची रीघ लागली होती. दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील व कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी मंत्री हसन मुश्रीफ, शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक, इचलकरंजीचे आमदार सुरेश हळवणकर यांनी पाटील कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करून गणपतराव पाटील, भाऊ आण्णासाहेब पाटील व पत्नी कृष्णाबाई यांची विचारपूस केली.गणपतराव पाटील यांच्याशी चर्चा करताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सा. रे. पाटील यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला आहे. आयुष्याच्या शेवटपर्यंत ते कार्य करीत राहिले. त्यांच्या विधानसभा अथवा कारखान्याच्या निवडणुकीवेळी चर्चा करायचे. कॉँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते व पक्षश्रेष्ठींसमोर त्यांचा मोठा दबदबा होता. काम करण्याची हातोटी व कार्यक्षमतेची कॉँग्रेस हायकमांडला माहिती होती. सामान्यांच्या हिताला बाधा न आणता त्यांनी आयुष्यभर सहकारात काम केले. एक चांगला नेता हरपल्याचे दु:ख होत आहे.गुरुवारी दिवसभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्यान्नावर, इचलकरंजी जनता बॅँकेचे अशोक सौंदत्तीकर, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष संभाजीराव पाटील, उद्योगपती बाबूलाल मालू, प्रताप होगाडे, चौंडेश्वरी शिक्षण संस्थेचे कस्तुरे, चौंडेश्वरी सूतगिरणीचे अध्यक्ष विठ्ठलराव डाके, माजी आमदार काका पाटील (निपाणी), कामगार इंटकचे शामराव कुलकर्णी, सुरेश पाटील (इचलकरंजी), तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज, शाहू कारखान्याचे विजय औताडे, बी. एम. पाटील, प्रदीप पाटील, कुरुंदवाडचे सुनील पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दत्त कारखाना दुसऱ्या दिवशीही सुन्नच
एक आदर्श कारखाना म्हणून ‘दत्त’ची ओळख आहे. या कारखान्याने शिरोळ तालुक्यासह कर्नाटक सीमाभागातील शेतकऱ्यांना फार मोठा हातभार लावला आहे. हजारो कामगारांच्या जीवनातही आनंदाचे मळे फुलविले. सा. रे. पाटील यांची एक्झिट सहन न होणारी आहे. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रासह तालुक्यात गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सन्नाटाच दिसत होता.