राधानगरी ९० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढला
By Admin | Updated: July 31, 2014 00:38 IST2014-07-31T00:33:09+5:302014-07-31T00:38:15+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आज, बुधवारी पावसाचा जोर वाढला आहे.

राधानगरी ९० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढला
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आज, बुधवारी पावसाचा जोर वाढला आहे. धरण क्षेत्रातही दमदार पाऊस सुरू असून, राधानगरी धरण ९० टक्के भरले आहे. प्रतिसेकंद १८०० घनफूट पाण्याचा विसर्ग राधानगरीतून सुरू असल्याने धरण संथगतीने भरत आहे. तरीही पावसाचा जोर असाच राहिला तर येत्या दोन-तीन दिवसांत धरण पूर्णक्षमतेने भरण्याची शक्यता आहे. वारणा धरण ८७ टक्के भरले असून, बहुतांश धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात गेली दोन दिवस पावसाचा जोर वाढला आहे. आज सकाळ पासूनच कोल्हापूर जिल्ह्यात दमदार पाऊस कोसळत आहे. एकसारखी रिपरिप असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात गगनबावडा तालुक्यात १०६ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. धरण क्षेत्रातही अतिवृष्टी झाली असून, धरणाच्या पातळीत वाढ होत आहे.
राधानगरी धरण क्षेत्रात १२७ मिली मीटर, तर दूधगंगा धरणक्षेत्रात ९७ मिली मीटर पाऊस झाल्याने धरणांची पातळी वाढली आहे. वारणा धरणातून १७७५ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वारणा नदीच्या पातळी झपाट्याने वाढ होत आहे.
पंचगंगेची पातळी पुन्हा २७ फुटांवर गेली आहे. जिल्ह्यातील २४ बंधारे पाण्याखाली गेले असून सात मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले होते. पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक काही प्रमाणात कमी दिसत होती.
दरम्यान, गावडी (ता. शाहूवाडी) येथील आनंदा राजाराम केसरकर (वय ४०) यांचा ओढ्याच्या पाण्यातून वाहून जाऊन मृत्यू झाला. धमकवाडी-गावडी दरम्यानच्या ओढ्यात त्यांचा मृतदेह सापडला.
तालुकानिहाय झालेला पाऊस असा -
करवीर - १६.६९, कागल -२२.३१, पन्हाळा -२४, शाहूवाडी -३१, हातकणंगले -२, शिरोळ -३.५७, राधानगरी -४५.२७, गगनबावडा -१०६, भुदरगड -३४.८०, गडहिग्लज -१०, आजरा -४९.५०, चंदगड -४८.५०. (प्रतिनिधी)