राधानगरीत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त

By Admin | Updated: April 10, 2015 00:28 IST2015-04-09T22:27:42+5:302015-04-10T00:28:03+5:30

शेतकऱ्यांची गैरसोय : पर्यवेक्षकांकडून सेवा

Radhagari Veterinary Officer's vacancies are vacant | राधानगरीत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त

राधानगरीत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त

सोळांकूर : राधानगरी तालुक्यातील श्रेणी-१ मधील मंजूर असलेली सर्वच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे केवळ सहा पशुधन पर्यवेक्षकांकडून पशुवैद्यकीय सेवा सुरू आहे. त्यामुळे या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची वैद्यकीय सेवा देताना तारांबळ होत आहे. तर आवश्यक वेळेवरील उपचारांअभावी शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ही पदे त्वरित भरावीत, अशी मागणी होत आहे.
राधानगरी तालुक्यात १४ पशुवैद्यकीय दवाखाने कार्यरत आहेत. तालुक्यात सध्या ६७ हजार पशुधन आहे. तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्याने सर्वच गावांतील जनावरांना वैद्यकीय सेवा देणे अशक्य होते. त्यात गतवर्षीपेक्षा यावर्षी पशुधनाची संख्या झपाट्याने वाढली आहे.
तालुक्यात सरवडे, घोडवडे, कसबा वाळवे, कसबा तारळे, ठिकपुर्ली, राशिवडे, सोळांकूर, तळाशी या आठ केंद्रांवर पशुधन विकास अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. या केंद्रांतून आसपासच्या दहा गावांतील पशुधनावर उपचार केले जातात. याठिकाणी पूर्णवेळ अधिकारी, पर्यवेक्षक असणे आवश्यक आहे. राधानगरी, शिरगाव, धामोड, आणाचे ओलवण या ठिकाणी पशुवैद्यकीय पर्यवेक्षक कार्यरत आहेत. त्यांची या व्यतिरिक्त १४ उपकेंद्रांवर सेवा देताना तारांबळ उडत आहे. आठवड्यातील एक दोन दिवस असे कामाचे नियोजन करून ते पशुवैद्यकीय तपासणी करीत आहेत. त्यामुळे इतरवेळी वैद्यकीय दवाखाने बंद राहतात. वेळेत जनावरांच्या उपचारासाठी अधिकारी उपलब्ध होत नसल्याने गोकुळ दूध संघाच्या अथवा खासगी डॉक्टरांचा आधार शेतकऱ्यांना घ्यावा लागत आहे. अधिकाऱ्यांविना शासनाच्या कामधेनू दत्तक ग्रामयोजना, विविध आजारांचे लसीकरण निर्मूलन शिबिरे, आदी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाहीत.
यावर्षी सोळांकूर, सरवडे, पालकरवाडी, मजरे, कासारवाडा, राशिवडे, आमजाई व्हरवडे, पडळी, तुरंबे ही गावे कामधेनू दत्तक ग्राम योजनेत सहभागी झाली आहेत. ही योजना राबविण्यासाठी पशुधन विकास अधिकारी भरण्याची आवश्यकता आहे. ही पदे भरण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

पदे रिक्त असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. त्याचबरोबर तांत्रिक कामे अपूर्ण राहत असून, योग्य ती उपचारपद्धती, शासनाच्या सर्वच विविध योजना, शिबिरे, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात विलंब होत आहे. ही पदे भरल्यास कारभार सुरळीत चालेल.
- डॉ. प्रदीप भोरे, पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती राधानगरी.

Web Title: Radhagari Veterinary Officer's vacancies are vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.