अत्याचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटतील
By Admin | Updated: July 27, 2014 23:04 IST2014-07-27T22:50:46+5:302014-07-27T23:04:14+5:30
शिवसेनेचा इशारा : कर्नाटकचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटण्यासाठी रविवारी कऱ्हाडला

अत्याचाराचे पडसाद महाराष्ट्रात उमटतील
कऱ्हाड : ‘सीमा भागातील मराठी माणसांवर कर्नाटक पोलिसांकडून अत्याचार केला जात आहे. हा अत्याचार महाराष्ट्र सहन करणार नाही. संपूर्ण शिवसेना सीमावासीयांच्या पाठीशी आहे. सीमा भागात होत असलेला अत्याचार न थांबल्यास त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटतील,’ असा इशारा शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते यांनी दिला.
येळ्ळूर येथील घटनेच्या निषेधार्थ रविवारी सायंकाळी शिवसेनेच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापुरातील शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, सांगली जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, नरेंद्र पाटील, हर्षद कदम, चंद्रकांत जाधव, जयवंत शेलार, संजय मोहिते, नितीन काशीद, शशिकांत हापसे यांच्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी शहरातील विजय दिवस चौक ते तहसील कार्यालयापर्यंत शिवसेनेच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. भगव्या झेंड्याबरोबरच काळे झेंडे दाखवून कर्नाटक पोलिसांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तहसील कार्यालयसमोर आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार रावते म्हणाले, ‘सीमा भागातील प्रश्न सर्वाेच्च न्यायालयात आहे. महाराष्ट्र शासनाने न्यायालयात पाठपुरावा केलेला नाही. ते या प्रश्नावर तोडगा काढण्यात अपयशी ठरले आहे. महाराष्ट्रातील शासन बदलल्याशिवाय ठोस निर्णय होणार नाही.’ (प्रतिनिधी)
कर्नाटकचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटण्यासाठी रविवारी कऱ्हाडला आले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे अनास्था दाखवली. पुरेसा वेळ त्यांनी शिष्टमंडळाला दिला नाही. यावरूनच त्यांना सीमावासीयांची किती काळजी आहे, हे कळते. अशा मीतभाषी महाराष्ट्र शासनाचाही आम्ही निषेध करतो, असेही आमदार दिवाकर रावते आपल्या भाषणात म्हणाले.