पशुधन वाचविण्यासाठी शर्यत, गोवंश बंदी उठवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:21 IST2021-01-08T05:21:34+5:302021-01-08T05:21:34+5:30
पेठवडगाव : बैलगाडी शर्यतीवरील व गोवंश हत्याबंदीचा कायदा, बंदी उठवावी त्याचप्रमाणे कर्नाटक सरकारने म्हैशींच्या बाजारावर बंदी घातली आहे. आता ...

पशुधन वाचविण्यासाठी शर्यत, गोवंश बंदी उठवा
पेठवडगाव : बैलगाडी शर्यतीवरील व
गोवंश हत्याबंदीचा कायदा, बंदी उठवावी त्याचप्रमाणे कर्नाटक सरकारने म्हैशींच्या बाजारावर बंदी घातली आहे. आता तर धर्माचे नाव पुढे करून पारंपरिक कायद्यात बदल करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. अशा शेतकरी, व्यापारी, पूरक व्यावसायिक यांच्या विरोधातील कायदे हाणून पाडण्यासाठी आरपारची लढाई करावी लागेल, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी केले.
येेथील वडगाव बाजार समितीमध्ये शेतकरी, व्यापारी यांची सभा घेण्यात आली. यावेळी शेतकरी, व्यापारी, पूरक व्यावसायिक यांची मते जाणून घेतल्यानंतर पाटील बोलत होते.
यामध्ये देवदास अवघडे (भादोले) म्हणाले, जनावरे कायद्याचा धाक, भीती घालून दहशत घालण्याची प्रवृत्ती वाढली आहे. आम्ही जनावरे व्यापाराच्या जिवावर गेली ३० वर्षे व्यवसाय करत आहे. काही संघटनांचे कार्यकर्ते भीती घालून पैसे उकळतात. कायद्याच्या माध्यमातून व्यापारी, शेतकऱ्यांना चिरडायचे सुरू आहे. यावेळी आबासाहेब काशिद-वस्ताद (घुणकी), आनंदराव माने, सलीम मिराशी (राजस्थान), अरूण पोवार (भेंडवडे) यांनी मते मांडली. कराड, चाकण, सांगोला बाजारात जनजागृती केली आहे. वन्यप्राणी संरक्षण कायदे, शर्यतीबंदी, गोवंश बंदी कायदे बंद झालेच पाहिजे. यासाठी मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी प्रशासक चेतन चव्हाण, एम. के. चव्हाण, लक्ष्मण पाटील, नाभिराज देसाई, कृष्णात भिसे, प्रकाश घारे आदींसह शेतकरी, व्यापारी उपस्थित होते.
----------------------
चौकट:
वांझ म्हैस, बश्या बैलाचे काय करायचे. हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पशुधन सांभाळणे खर्चिक होत आहे. अपुऱ्या ज्ञानामुळे बैलाला पत्री मारून त्रास दिला जातो. अशाप्रकारे सांगणाऱ्यांमुळे पशुधन गोत्यात आले आहे. अशा कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी एकवटण्याचे आवाहन रघुनाथ पाटील यांनी केले.