करवीरमध्ये सरपंचपदासाठी रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:01 IST2021-02-05T07:01:46+5:302021-02-05T07:01:46+5:30
कोपार्डे : करवीर तालुक्यात झालेल्या निवडणुकीत ३४ ग्रामपंचायतींत स्थानिक आघाडींनी बाजी मारली खरी, पण हाय व्होल्टेज असणाऱ्या अनेक ग्रामपंचायतींमध्ये ...

करवीरमध्ये सरपंचपदासाठी रस्सीखेच
कोपार्डे : करवीर तालुक्यात झालेल्या निवडणुकीत ३४ ग्रामपंचायतींत स्थानिक आघाडींनी बाजी मारली खरी, पण हाय व्होल्टेज असणाऱ्या अनेक ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदामुळे रस्सीखेच होणार आहे. आता गटनेत्यांना इच्छुकांना आवर घालण्याबरोबर आघाडी कायम राखण्याचे अग्निदिव्य पार पाडावे लागणार आहे.
करवीर तालुक्यातील ११८ ग्रामपंचायतींंचे सरपंच आरक्षण काढण्यात आले. यात पहिल्या टप्प्यात झालेल्या ५४ व दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या ६४ ग्रामपंचायतींंचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या ५४ ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्यानंतर सरपंच आरक्षण काढण्यात आले; पण सरपंच पदाचा अंदाज न आल्याने अनेक गावांत स्थानिक आघाड्या झाल्या आणि तब्बल ३४ ठिकाणी यशही मिळविले आहे. या ११८ ग्रामपंचायतींपैकी ज्या ५४ ग्रामपंचायतींंच्या निवडणूक झाल्या यातील हायव्होल्टेज असणाऱ्या हणमंतवाडी, नागदेववाडी, सडोली खालसा, महे, इस्पुर्ली, दोनवडे, खुपिरे, मुडशिंगी, कुडित्रे, शिये, चुये, कोगे, रजपूतवाडी,कोथळी या गावांत सर्वसाधारण पुरुष अथवा महिला आरक्षण आले आहे. येथे आपल्याला संधी मिळावी यासाठी साम, दाम, दंडचा वापर होणार आहे. तर महिला आरक्षण असणाऱ्या ठिकाणी आपली पत्नी, सून यांची वर्णी लावण्यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. सरपंच पदासाठी प्रथम नातेवाईक, त्यानंतर जवळचा कार्यकर्ता व त्यानंतर गटाचा कार्यकर्ता असा प्राधान्यक्रम राहणार असल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे. यामुळे आघाड्यांची बिघाडी होऊ नये यासाठी गटनेत्यांची रात्रंदिवस नजर आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गमध्येही अनेकांनी आपली सरपंच पदासाठी दावेदारी दाखल करीत गटनेत्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. यातही कोपार्डे, पाटेकरवाडी, तामगाव, बालिंंगा, सडोली दुमाला, हळदी, कुर्डू, भुये, हिरलडे दुमाला, हासूर दुमाला, भाटणवाडी या गावांत पुरुष आरक्षण असले तरी आपण स्वतः आणि महिला असेल, तर पत्नी अथवा सून यांची वर्णी लावावी यासाठी समीकरणे जुळवाजुळव सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी आताच आरक्षण जाहीर झाल्याने आतापासूनच राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.