रा. चिं. ढेरेंचा कोल्हापूरशी ऋणानुबंध
By Admin | Updated: July 2, 2016 00:46 IST2016-07-02T00:46:08+5:302016-07-02T00:46:08+5:30
‘कोल्हापूरची महालक्ष्मी’ पुस्तक लोकप्रिय : अंबाबाईचे दर्शन, रमेश जाधवांची भेट ठरलेली

रा. चिं. ढेरेंचा कोल्हापूरशी ऋणानुबंध
कोल्हापूर : संत साहित्य, लोकसाहित्य, मंदिर, देव-देवतांच्या इतिहासाचे अभ्यासक रा. चिं. ढेरे यांचा कोल्हापूरशी ऋणानुबंध होता. त्यांचे ‘कोल्हापूरची महालक्ष्मी’ हे पुस्तक प्रचंड गाजले. हे पुस्तक वाचले की देवीच्या मूळ स्वरूपाची माहिती मिळते.
रा. चिं. ढेरे यांचे अनेकदा कोल्हापूरला येणे-जाणे असे. खंडोबा, तुळजाभवानी, शनिशिंगणापूर अशा अन्य देवस्थानांप्रमाणे त्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईवरही प्रचंड अभ्यास केला. मूर्ती वर्णनापासून ते येथील प्रथा-परंपरा, देवीचा इतिहास, या सगळ्याच्या बारीक-सारीक तपशीलांचा अभ्यास करून त्यांनी ‘कोल्हापूरची महालक्ष्मी’ हे पुस्तक प्रकाशित केले. रा. चिं. ढेरे यांचे हे पुस्तक आणि आणि ग. ह. खरेंचे ‘महाराष्ट्रातील चार दैवते’ ही पुस्तके वाचली की कोल्हापूरच्या अंबाबाईचा पूर्ण इतिहास कळतो.
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव यांच्यावर ते पुत्रवत प्रेम करत. डॉ. जाधव आणि त्यांची भेट सन १९९१ पासूनची. त्यांच्या ‘लोकराजा छत्रपती शाहू’ व ‘लोकमान्य’ ही दोन पुस्तके प्रकाशित होण्यामागे त्यांची प्रेरणा होती अशी आठवण त्यांनी सांगितली. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीदिनी प्रकाशित झालेला राजर्षी शाहू गौरव ग्रंथात रा. चिं. ढेरे यांनी शाहू छत्रपती आणि आर्य समाज संबंधांवर लेख लिहिला आणि त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. कोल्हापूरला आले की ते प्रथम अंबाबाईचे दर्शन घेत आणि त्यानंतर डॉ. रमेश जाधव यांची भेट घेत असत.
मंदिर व मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा यांना भेटत. या भेटीत ते अंबाबाई मूर्ती आणि मंदिर प्रकारांवर चर्चा करीत.
मराठीतील व्यासंगी आणि शिस्तीचा साहित्यिक म्हणून रा. चिं. ढेरे यांचा उल्लेख करावा लागेल. एखाद्या गोष्टीची खोलात जाऊन माहिती मिळविणे, प्रवास करून त्याचे संदर्भ गोळा करणे हा त्यांचा शिरस्ता होता. मराठी संस्कृती, देव-देवता, प्राचीन मिथके यांच्याबद्दलचे त्यांचे संशोधन मान्यताप्राप्त आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एका चांगल्या संशोधकाला मुकला आहे.
- सुनीलकुमार लवटे
(ज्येष्ठ साहित्यिक)
रा. चिं. ढेरे हे फार मोठे संशोधक होते. महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांवर त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तके गाजली. ते माझ्यावर पुत्रवत प्रेम करत. माझे दोन ग्रंथ प्रकाशित होण्यामागे केवळ त्यांचे प्रयत्न होते.
- डॉ. रमेश जाधव (ज्येष्ठ इतिहास संशोधक)
रा. चिं. ढेरेंशी माझी ओळख ‘कोल्हापूरची महालक्ष्मी’ या पुस्तक प्रकाशनानंतर झाली. कोल्हापूरचे नसतानाही त्यांनी अंबाबाई मंदिराचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला होता. हे पुस्तक लिहून त्यांनी संशोधक, अभ्यासक आणि भक्तांना महत्त्वाचे साहित्य उपलब्ध करून दिले आहे. त्यांचा व्यासंग बघून मी थक्क झालो.
- उमाकांत राणिंगा (मूर्ती अभ्यासक)