आर. के. पोवार यांचा ‘हायटेक’ प्रचार; ‘थ्री-डी’ सभांचा अवलंब
By Admin | Updated: October 10, 2014 23:01 IST2014-10-10T21:52:10+5:302014-10-10T23:01:31+5:30
फेसबुक, टिष्ट्वटर, ब्ल्यू ट्यूथ, व्हॉटस अॅपचा वापर

आर. के. पोवार यांचा ‘हायटेक’ प्रचार; ‘थ्री-डी’ सभांचा अवलंब
कोल्हापूर : ‘कोल्हापूर उत्तर’ मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आर. के. पोवार यांच्या प्रचारासाठी पक्षाच्यावतीने चक्क ‘थ्री-डी’ सभांचे तंत्र अवलंबले आहे. त्यांचा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, आर. आर. पाटील यांच्यासह पक्षाच्या विविध नेत्यांच्या ‘थ्री-डी’ सभांच्या माध्यमातून थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. या तंत्रज्ञानामुळे पक्षाचे नेते थेट मतदारांशी संवाद साधत असल्याचा भास होतो. निवडणूक काळात राज्यभरात पक्षाच्या विविध नेत्यांच्या एक हजार थ्री-डी सभांचे आयोजन केले आहे. यासाठी पक्षाने ३० अद्ययावत वाहनांची व्यवस्था केली असून, राज्याच्या विविध भागांत रोज १२० थ्री-डी सभांच्या माध्यमातून मतदारांशी सुसंवाद साधण्याचा कल्पक प्रयत्न पक्षाने केला आहे. या निवडणुकीत अशी यंत्रणा वापरणारा राष्ट्रवादी कॉँग्रेस हा पहिलाच पक्ष आहे. कोल्हापुरात बिंदू चौक, मिरजकर तिकटी, भवानी मंडप, कपिलतीर्थ मार्केट, शिवाजी चौक, यादवनगर, विचारेमाळ, सदरबाजार या भागात थ्री-डी सभांना मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. उत्तर मतदारसंघात विविध ठिकाणी पाच पुरुष कलाकार व दोन महिला कलाकारांच्या सहभागाने पथनाट्य सादर केले जात आहे.
यामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसने राबविलेल्या विविध योजना, धोरणे, मराठा व मुस्लिम आरक्षण, आदी कामे यातून मतदारांसमोर पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचबरोबर फेसबुक, ब्ल्यूट्यूथ, व्हॉटस अॅप, आदी माध्यमातून आर. के. पोवार यांचा प्रचार सुरू आहे. (प्रतिनिधी)
फेसबुक, टिष्ट्वटर,
ब्ल्यू ट्यूथ, व्हॉटस अॅपचा वापर
120
थ्री-डी सभांच्या माध्यमातून मतदारांशी सुसंवाद साधण्याचा कल्पक प्रयत्न
30
अद्ययावत वाहनांची सुसज्ज व्यवस्था