आर. के.-फरास यांच्यात खडाजंगी
By Admin | Updated: July 27, 2015 00:28 IST2015-07-27T00:01:12+5:302015-07-27T00:28:30+5:30
राष्ट्रवादीची बैठक : आमचे फोटो झळकतात म्हणून पोटात का दुखते? : फरास

आर. के.-फरास यांच्यात खडाजंगी
कोल्हापूर : काही नगरसेवक फोटो झळकण्यासाठी पक्षाच्या कार्यालयात येतात. त्यांचे पक्षासाठी योगदान किती? हा संशोधनाचा विषय असल्याची टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केली. तर, आम्हाला जेवढे जमते, तेवढे काम करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आमचे फोटो झळकतात म्हणून कोणाच्या पोटात दुखत असेल तर त्याला आमचा नाईलाज असल्याचा पलटवार नगरसेवक आदिल फरास यांनी केला.
शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पक्षाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात शनिवारी (दि. २५) झाली. यामध्ये पोवार व फरास यांच्यात चांगलीच शाब्दिक फटकेबाजी झाली. पक्षातील अंतर्गत कुरघोडीवर बोट ठेवत आर. के. पोवार म्हणाले, ठरावीक लोकांना सोबत घेऊन शहर राष्ट्रवादीचे काम सुरू असल्याचा आरोप आमच्यावर होतो; पण सर्वांना बरोबर घेऊन सामूहिक निर्णय घेतले. पक्षाने दिलेल्या गाडीत बसतील एवढ्या कार्यकर्त्यांना घेऊन फिरलो, तरीही असे आरोप होत असतील तर मग काय रेल्वे घेऊन फिरायचे का? असा सवाल करीत, काही नगरसेवक फोटोसाठी पक्षाच्या कार्यालयात येतात. पक्षासाठी कोणी किती योगदान दिले हा संशोधनाचा विषय असल्याची टीकाही त्यांनी केली. याचे जोरदार खंडण करीत नगरसेवक आदिल फरास म्हणाले, मी मुश्रीफसाहेबांचा कार्यकर्ता आहे. २००३ पासून पक्षात प्रामाणिकपणे काम करीत पक्षवाढीचा प्रयत्न केला. आमच्या घराण्याला १९६२ पासूनचा राजकीय वारसा आहे. सर्वांत जास्त मताधिक्याने मी विजयी झालो. मला जेवढे जमेल तेवढे काम केले. तरीही वर्तमानपत्रांतील माझे फोटो पाहून कोणाच्या पोटात दुखत असेल तर मला त्याचा विचार करण्याची गरज नाही. आगामी काळात आर. के. पोवार यांच्या नेतृत्वाखालीच काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शहराची कार्यकारिणी करताना नवीन-जुन्यांचा मेळ घाला, अशी सूचना करीत आघाडी सरकारने शहराच्या विकासासाठी दिलेला निधी जनतेपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. शहराध्यक्ष राजू लाटकर, आर. के. पोवार व आदिल फरास यांनी एकत्रित येऊन निवडणुकीला ताकदीने सामोरे जाण्याचे आदेशही त्यांनी दिले.
५जनसुराज्य सोबतच
जनसुराज्य पक्ष हा आमचा नैसर्गिक मित्र आहे. या मित्राला बरोबर घेऊन राष्ट्रवादी महापालिकेची निवडणूक लढविणार असल्याचे सांगत कॉँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्याशी याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही आमदार मुश्रीफ यांनी सांगिंतले.
सेना-भाजपला शुभेच्छा
शिवसेना-भाजपमध्ये सुरू असलेल्या कलगीतुऱ्यावर बोलताना आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, कोण रांगत निवडून आले, कोणाची ताकद किती आहे, हे पाहण्यासाठी त्यांनी स्वतंत्रपणे लढून ताकद अजमावावी. त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत.