आर. के. नगर नाक्यावर ओसंडून वाहतोय कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:23 IST2021-04-27T04:23:30+5:302021-04-27T04:23:30+5:30

ज्योती पाटील पाचगाव : एकीकडे स्वच्छतेसाठी प्रशासनाकडून उपदेशांचे डोस दिले जात असले तरी आर.के. नगर नाक्यावरील कचऱ्याचे ढीग ...

R. K. Garbage is flowing on the city nose | आर. के. नगर नाक्यावर ओसंडून वाहतोय कचरा

आर. के. नगर नाक्यावर ओसंडून वाहतोय कचरा

ज्योती पाटील

पाचगाव : एकीकडे स्वच्छतेसाठी प्रशासनाकडून उपदेशांचे डोस दिले जात असले तरी आर.के. नगर नाक्यावरील कचऱ्याचे ढीग पाहिल्यावर मात्र, प्रशासनाची ही संवेदनशीलता कुठे हरवली आहे असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. आर. के. नाक्यावर गेल्या कित्येक दिवसांपासून मोठाले ढीग साचले आहेत. हा कचरा रस्त्यावर ओसंडून वाहत आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने याकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याने या परिसरात कचऱ्याची दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे हे कचऱ्याचे ढीग प्रशासन कधी उचलणार असा सवाल येथील नागरिकांमधून उपस्थित होत आहे. कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या आर. के. नगरसह उपनगर भागात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या या भागात कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कचराकुंड्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. दिवसागणिक गोळा होणारा कचरा वेळेत उठाव न केल्याने इतरत्र पसरला जातो. अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावर व मुख्य चौकातच कचराकुंड्या ठेवल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. शिवाय या कचऱ्याची दुर्गंधी सुटल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. अनेक कचराकुंड्यांमध्ये कचरा साचून राहिल्याने या ठिकाणी कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. अनेकदा ही कुत्री वाहनधारक आणि पादचाऱ्यांवरही हल्ला करीत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर कचरा प्रशासनाने तत्काळ उचलावा अशी मागणी होत आहे.

चौकट : हद्दीचा वाद...कचरा रस्त्यावरच

या रस्त्याचा काही भाग महापालिकेच्या हद्दीत येतो तर काही भाग पाचगाव व मोरेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. त्यामुळे नेमका कचरा कुणी उचलायचा या वादातच येथील कचरा पडून आहे. या परिसरातील बहुतेकजण नोकरदार असल्याने कामानिमित्त सकाळी बाहेर पडताना कचऱ्याची पिशवी घेऊन ते जाता-जाताच रस्त्याकडेला भिरकावत असतात.

कोट : आर. के. नगर नाक्यावर रस्त्याशेजारी कचऱ्याचे मोठे ढीग लागल्याने वाहनधारकांना व येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना याचा खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अनेकांच्या आरोग्याच्या तक्रारीही वाढले आहेत. याकडे संबंधित प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावावा.

- भिकाजी भिलुगडे, नागरिक मोरेवाडी.

कोट : नागरिकांनी रस्त्यावर कचरा न टाकता ग्रामपंचायत कर्मचारी ज्यावेळी घंटागाडी घेऊन येतात. त्यावेळी कचरा देऊन सहकार्य करावे. तसेच रस्त्यावर टाकलेला कचरा लवकरच उचलू. - अमर मोरे, माजी सरपंच, मोरेवाड.

Web Title: R. K. Garbage is flowing on the city nose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.