लस संपली तरी कोल्हापुरात नागरिकांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:25 IST2021-04-28T04:25:32+5:302021-04-28T04:25:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महानगरपालिकेकडील उपलब्ध लस संपली तरी मंगळवारी शहरातील सर्वच केंद्रांवर नागरिकांना गर्दी केली. लस ...

Queues of citizens in Kolhapur even after vaccination is over | लस संपली तरी कोल्हापुरात नागरिकांच्या रांगा

लस संपली तरी कोल्हापुरात नागरिकांच्या रांगा

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महानगरपालिकेकडील उपलब्ध लस संपली तरी मंगळवारी शहरातील सर्वच केंद्रांवर नागरिकांना गर्दी केली. लस मिळेल या अपेक्षेने चार-पाच तास रांगेत उभे राहिलेल्या नागरिकांचा अखेर भ्रमनिरास झाला. आज, बुधवारीही शहरातील सर्वच आरोग्य केंद्रांवरील लसीकरण बंद राहणार आहे.

रविवारी मिळालेल्या लसीचा साठा संपला आहे. मंगळवारी काही प्रमाणात ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती, त्यांचे लसीकरण करण्यात येणार होते. याबाबत केंद्रावरील कर्मचारी वारंवार सांगत होते, तरीही नागरिक त्यांच्यावर विश्वास ठेवत नव्हते. लसीकरण केंद्राबाहेरची मंगळवारची गर्दी सोमवारच्या तुलनेने कमी होती. प्रत्येक केंद्राबाहेर दोन- अडीचशे नागरिक रांगेत होते. लस संपली आहे, घरी जावे असे सांगितले जात होते. मात्र दुपारनंतर लस येईल अशा अपेक्षेने नागरिकांची गर्दी दुपारपर्यंत होती. अखेर सर्वांचाच भ्रमनिरास झाला.

राजारामपुरीतील केंद्रावर मात्र मोठी गर्दी झाली होती. येथे काही नागरिक रोज येऊन रांगेत उभे राहतात. त्यांना लस मिळत नाही. मंगळवारीही त्यांना लस मिळाली नाही, म्हणून त्यांचा संताप अनावर झाला. काही नागरिकांनी केंद्रातील कर्मचाऱ्यांशी वाद घातले. रोज किती जणांना लस मिळणार हे सांगा म्हणजे रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचेल, अशा शब्दात त्यांनी आपला राग व्यक्त केला.

ही काय रॉकेलची पाळी आहे का?

राजारामपुरीत नागरिकांची मोठी गर्दी होती. त्यात सोशल डिस्टन्स पाळले जात नव्हते. ढकलाढकली होत होती. त्यामुळे संतापलेल्या एका नागरिकाने ही गाय रॉकेलची पाळी आहे का? अशा शब्दात विचारणा करून सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन केले.

-सावित्रीबाई फुले- १४४, फिरंगाई - १२२, राजारामपुरी- ११६, पंचगंगा १८६, कसबा बावडा-११०, महाडिक- ११०, आयसोलेशन- १६५, फुलेवाडी- ११२, सदरबाजार- १०७, सिद्धार्थनगर- १४०, मोरेमाने नगर- ११२, सीपीआर - ४१४, खासगी रुग्णालये- ४७२.

- मंगळवारचे लसीकरण - २२०७

- आतापर्यंतचे लसीकरण -

- पहिला डोस - १०६४४१

- दुसरा डोस २३,६३९

-आज लसीकरण बंद-

आज बुधवारी महानगरपालिकेच्या सर्व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावर कोविशिल्ड लस उपलब्ध नसल्यामुळे पहिला व दुसरा डोसचे लसीकरण बंद राहणार आहे. तसेच प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले, राजारामपुरी, फुलेवाडी येथे कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस चालू राहणार आहे. सीपीआर हॉस्पिटल येथे कोविशिल्ड लस नसल्याने पहिला व दुसरा डोसचे लसीकरण बंद राहील तर कोव्हॅक्सिन दुसरा डोसचे लसीकरण चालू राहणार आहे.

Web Title: Queues of citizens in Kolhapur even after vaccination is over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.