साखर कारखान्यांचे प्रश्न चंद्रकांतदादांनी सोडवावेत
By Admin | Updated: January 16, 2015 00:25 IST2015-01-16T00:23:02+5:302015-01-16T00:25:23+5:30
हसन मुश्रीफ : घोरपडे कारखान्याचा पहिला गळीत हंगाम

साखर कारखान्यांचे प्रश्न चंद्रकांतदादांनी सोडवावेत
कागल : सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे प्रामाणिक आहेत. शेतकरी आणि साखर कारखाने यांचे प्रश्न सोडविण्याची त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. मात्र, त्यांनी मंत्रिमंडळाच्या समोर हे विषय आग्रहीपणे मांडण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.कागल येथील निवासस्थानी संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामाबद्दल ते पत्रकारांशी बोलत होते. ‘एफआरपी’च्या मुद्द्यावर ते म्हणाले की, शेतकरी आणि साखर कारखाने या दोघांनाही न्याय देण्याची भूमिका केंद्र आणि राज्य सरकारने घेतली पाहिजे. चंद्रकांतदादा पाटील यांनी याबद्दल काही घोषणा केल्या. आपली भूमिकाही स्पष्टपणे मांडली आहे. ते स्वत: प्रामाणिकपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, मंत्री म्हणून ते नवखे आहेत. सरळमार्गी आहेत. त्यांनी केलेल्या घोषणा निव्वळ घोषणा राहणार नाहीत, याची दक्षता त्यांनी घेतली पाहिजे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी या संदर्भात केलेल्या घोषणेचे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी ‘खंडन’ केले. म्हणून निव्वळ घोषणा करण्यापेक्षा मंत्रिमंडळात निर्णय घ्यावा. साखर कारखानदारीत सर्वच राजकीय पक्षांचे नेते कमी-जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे या प्रश्नावर राजकारण करून साखर उद्योग अडचणीत आणू नये. कारण साखर उद्योग अडचणीत आला तर पर्यायाने शेतकऱ्यांचेच नुकसान होणार आहे. (प्रतिनिधी)