वीज कामगारांचे प्रश्न अधिवेशनात मांडणार
By Admin | Updated: December 29, 2014 00:00 IST2014-12-28T22:23:42+5:302014-12-29T00:00:44+5:30
भालचंद्र मुणगेकर : ‘बहुजन विद्युत अभियंता फोरम’चे राज्यस्तरीय अधिवेशन

वीज कामगारांचे प्रश्न अधिवेशनात मांडणार
कोल्हापूर : वीज कामगारांची सुरक्षितता, आरोग्य, पगारवाढ हे प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मांडणार आहे, अशी ग्वाही राज्यसभेचे खासदार डॉ़ भालचंद्र मुणगेकर यांनी दिली़ बहुजन विद्युत अभियंता अधिकारी व कर्मचारी फोरमचे द्विवार्षिक चौथे राज्यस्तरीय अधिवेशन आज, रविवारी दसरा चौक येथील मैदानावर झाले़ अधिवेशनाचे उद्घाटन डॉ़ मुणगेकर यांच्या हस्ते झाले़ यानंतर ते ‘भारतीय कामगार कायदे व त्यांची अंमलबजावणी’ या विषयावर बोलत होते़ अध्यक्षस्थानी बहुजन फोरमचे अध्यक्ष शिवाजी वायफळकर होते़
डॉ़ मुणगेकर म्हणाले, महाराष्ट्र वीज मंडळाचे तीन कंपन्यांत विभाजन करण्यास मी विरोध केला होता़ तत्कालीन महाराष्ट्र सरकारने विजेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलेले नव्हते़ वीजनिर्मिती करताना हा व्यवसाय आतबट्ट्याचा होणार नाही, याची काळजी सरकारने घेतली नाही़ वीज ही अत्यावश्यक गरज असल्यामुळे या क्षेत्रातील सर्वच घटकांबाबत व्यापक दृष्टिकोनाची गरज आहे़ प्रा़डॉ़ राजेंद्र कुंभार, आमदार सुजित मिणचेकर, ‘महावितरण’चे मानव संसाधन कार्यकारी संचालक डॉ़ मुरहरी केळे आदींनी मनोगत व्यक्त केले़
अधिवेशनातील ठराव
वीजखात्यातील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना वेतनगटनिहाय अधिसंख्य पदे निर्माण करून सामावून घेण्यात यावे.
वर्ग तीन व चारची भरती प्रक्रिया राबविण्याबाबत तिन्ही कंपन्यांमध्ये सुसूत्रता आणावी,
गुणवत्तावाढीसाठी कंपनीच्या प्रशिक्षण संस्थेतर्फेच कर्मचारी व अभियंते यांना प्रशिक्षण द्यावे, सोयीच्या किंवा नजीकच्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करावी,
तिन्ही कंपन्यांमधील ठेकेदारी पद्धती रद्द करावी, खासगी उद्योगांना, सहकार क्षेत्राला सहकार कायदा लागू करण्यात यावा.