वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
By Admin | Updated: October 24, 2015 00:37 IST2015-10-23T21:10:35+5:302015-10-24T00:37:12+5:30
आजरा शहर : २००८ ची पुनरावृत्ती टळली; अतिक्रमणाचा प्रश्नही मार्गी लागण्याची गरज

वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
ज्योतीप्रसाद सावंत- आजरा --मंगळवारी सायंकाळी दुचाकी पार्किंगवरून वाहनचालक व पोलीस निरीक्षक यांच्यात झालेल्या वादग्रस्त प्रकरणामुळे २००८ची पुनरावृत्ती टळली असली, तरी प्रकरणाचे मूळ पाहिल्यास आता पुन्हा एखादे प्रकरण घडण्याआधी शहरातील वाहतुकीचा, अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहरामध्ये वाहतूक समस्येच्या पार्श्वभूमीवर आजरा ग्रामपंचायत, पोलीस खाते, महसूल यांची वारंवार बैठक झाली. चर्चेचे गुऱ्हाळही झाले. प्रत्यक्षात कार्यवाही मात्र शून्य, असाच प्रकार राहिला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्ता मुळातच अरुंद आहे. त्यात असणारी अतिक्रमणे तसेच रस्त्याशेजारी चारचाकी व दुचाकी उभी असणारी वाहने अक्षरक्ष: डोकेदुखी ठरतात.
याच कारणावरून वाहनचालक, पादचारी यांच्यात वारंवार वाद होताना दिसतात. हाच वाद मंगळवारी पोलीस निरीक्षक व संबंधित दुकानदार यांच्यात झाला; पण पडसाद वेगळ्या पद्धतीने उमटले. पंधरवड्यापूर्वी गणेश मंडळावर डॉल्बीप्रकरणी झालेली कारवाई, स्थानिक नेतेमंडळींना पोलीस निरीक्षकांकडून न दिली जाणारी किंमत. नवरात्रौत्सवातील कार्यक्रमानंतर कायद्याच्या बडग्यामुळे येणाऱ्या मर्यादा व पोलीस दलातीलच काही मंडळींकडून पोलीस निरीक्षकांबाबत व्यक्त केली जाणारी नाराजी, या सर्वांची परिणती नागरिक रस्त्यावर उतरण्यामध्ये झाली. या घटनेला वेगळे वळण लागण्यापूर्वीच उपविभागीय अधिकारी डॉ. सागर पाटील व ज्येष्ठ नेते बाबूराव कुंभार यांनी सावध भूमिका घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
चूक कोणाची? या प्रश्नाचे उत्तर चौकशीअंती मिळेलच; पण वाहतुकीतील अडथळा हा या प्रकरणातील महत्त्वाचा भाग आहे, हे नाकारता येत नाही.
जोपर्यंत वाहतुकीचे योग्य नियोजन होत नाही, तोपर्यंत असे प्रकार घडतच राहणार. फरक एवढाच असेल की, कधी वाहनचालक व नागरिक, कधी फेरीवाले व दुकानदार, दुकानदार व कधी पोलीस, वाहनधारक व नागरिक, कधी फेरीवाले व दुकानदार, तर कधी पोलीस व वाहनधारक असाच आहे.
हल्ला कुणाचा ?
जमावाच्या मध्यभागी असणाऱ्या तक्रारदार कृष्णा इंदलकर यांचा मुलगा सचिन याच्या डोक्यावर जमावातीलच एकाने जोरदार वार करून त्याला जखमी केले. यामुळे जमावातील काही मंडळी प्रकरणाला वेगळे वळण लावण्याच्या प्रयत्नात होते, असेही पुढे येत आहे.