पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न : उच्चस्तरीय समितीची आज आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक
By Admin | Updated: December 3, 2014 00:24 IST2014-12-03T00:18:11+5:302014-12-03T00:24:50+5:30
पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सर्व पातळीवर एकत्रित प्रयत्न होण्यासाठी

पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न : उच्चस्तरीय समितीची आज आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक
कोल्हापूर : पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सर्व पातळीवर एकत्रित प्रयत्न होण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नेमलेल्या उच्चस्तरीय समितीची पहिली बैठक उद्या, बुधवारी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. ही बैठक पुणे विभागीय आयुक्त विकास देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून याचा अहवाल २२ डिसेंबरला उच्च न्यायालयात सादर होणार आहे. पंचगंगा नदीच्या पर्यावरणीय अभ्यास करणाऱ्या ‘निरी’ संस्थेने प्रदूषण रोखण्याबाबत शिफारशी केल्या आहेत. या शिफारशींचा अभ्यास करणे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम समिती करणार आहे. या बैठकीत निरीचे सदस्य व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांची घोषणा होईल.
पंचगंगा प्रदूषणाची सद्यस्थिती व उपाययोजनांवरही चर्चा होणार आहे. बैठकीला जिल्हाधिकारी राजाराम माने, महसूल उपायुक्त नानासाहेब बोटे, आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एस. एस. डोके, इचलकरंजीचे मुख्याधिकारी सुनील पोवार, याचिकाकर्ते दिलीप देसाई उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)