इचलकरंजी पालिकेच्या स्वायत्ततेवरच प्रश्नचिन्ह

By Admin | Updated: May 23, 2015 00:42 IST2015-05-22T21:29:20+5:302015-05-23T00:42:42+5:30

पालिकेत अस्वस्थता : शहर अंतर्गत रस्ते होणार बांधकाम विभागामार्फत

Question mark on autonomy of Ichalkaranji municipality | इचलकरंजी पालिकेच्या स्वायत्ततेवरच प्रश्नचिन्ह

इचलकरंजी पालिकेच्या स्वायत्ततेवरच प्रश्नचिन्ह

इचलकरंजी : शहराच्या बाह्यवळण रस्त्यांचा विकास आणि अंतर्गत प्रमुख रस्ते करण्यासाठी शासनाकडून नगरपालिकेला मिळालेले बारा कोटी रुपयांचे विशेष अनुदान थेट सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्लूडी)मार्फत खर्च करण्यात येतील, अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिल्याने नगरपालिकेची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.
शासनाकडून विविध विकास व नागरी सेवासुविधांसाठी मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम थेट शासनच विनियोग करणार असेल, तर नगरपालिकेच्या स्वायत्ततेचा प्रश्नच ऐरणीवर आला आहे.
जकात बंद होऊन नगरपालिकांना मिळणाऱ्या सहाय्यक अनुदानावर अवलंबून रहावे लागते आहे. सहावा वेतन आयोग लागू झालेने शासनाकडून मिळणारे हे अनुदान अत्यंत तोकडे पडू लागले आहे. परिणामी, सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना व विशेष अनुदानातून नगरपालिकांना अनुदान रक्कम मिळवावी लागते आणि त्यातून अनेक विकासकामे व नागरी सेवासुविधा पुरवाव्या लागत आहेत. इचलकरंजी शहर वस्त्रोद्योगात अग्रेसर असल्याने येथे रस्ते, पाणी व अन्न पायाभूत सेवासुविधा पुरविण्यासाठी नगरपालिकेची दमछाक होते. म्हणून शहरास रस्त्याच्या विकास, मजबूतीकरण, डांबरीकरण व दुरूस्तीसाठी विशेष अनुदान मिळण्याचा प्रस्ताव नगरपालिकेने दिला होता.
सध्याच्या नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे या राष्ट्रीय कॉँग्रेसच्या असून, त्यांची पक्षांतर्गत ठरलेली नगराध्यक्षपदाची मुदत संपल्यावर त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आणि बंड केले. या बंडाला नगरपालिकेत असलेल्या शहर विकास आघाडीने पाठिंबा दिला, तर शहर विकास आघाडीचे संस्थापक असलेले आमदार सुरेश हाळवणकर यांनी बिरंजे यांना पालिकेत येऊन अभय दिले. अशा पार्श्वभूमीवर नगरपालिकेत एका अर्थाने शहर विकास आघाडी सत्तास्थानी आहे, तर शहर विकास आघाडीचे प्रमुख नगरसेवक आणि कारभारी पालिकेचा कारभार हाकत आहेत, तरी विशेष रस्ता अनुदानाचे बारा कोटी थेट पीडब्लूडीमार्फत खर्च करणार असल्याचे आमदार हाळवणकर यांनी कालच (गुरुवारी) मुख्याधिकारी सुनील पवार यांची झाडाझडती घेताना सांगितले.
त्यामुळे नगरपालिकेची विश्वासार्हता कमी झालेय, असे आ. हाळवणकर यांनी सूचित केलेय का, असा प्रश्न उद्भवल्याने नगरपालिका क्षेत्रात खळबळ उडाली आहे. येथून पुढे शासनाकडून विविध कामांना मिळणारे अनुदानसुद्धा संबंधित शासनाच्या खात्याकडूनच थेट वापरले जाणार, अशा शंकेने नगरपालिकेत अस्वस्थता पसरली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Question mark on autonomy of Ichalkaranji municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.