धरण प्रकल्पांचा प्रश्न लवकरच मागी
By Admin | Updated: January 15, 2015 23:24 IST2015-01-15T00:20:53+5:302015-01-15T23:24:44+5:30
जलसंपदा मंत्र्यांची ग्वाही : संयुक्त बैठक घेणार्र

धरण प्रकल्पांचा प्रश्न लवकरच मागी
कुडाळ : नरडवे व टाळंबा प्रकल्पप्रश्नी येत्या पंधरा दिवसांत जलसंपदा मंत्री, महसूलमंत्री व वनमंत्र्यांची संयुक्त बैठक घेऊन वनसंज्ञेचा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. आज, बुधवारी सायंकाळी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या दालनात मंत्रालयात ही बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जलसंपदा विभागाच्या सचिव नीला शंकर, मुख्य अभियंता कुंजी, अधीक्षक अभियंता वाघमारे, कार्यकारी अभियंता गिरासे, आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनसंज्ञेच्या या प्रश्नाबाबत पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांनी मंत्री महाजन यांचे लक्ष वेधले. जिल्ह्यातील वनसंज्ञेचा प्रश्न कित्येक वर्षे खितपत पडलेला आहे. त्यामुळे तो निकाली लागणे कठीण आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील खासगी वनजमिनीसंदर्भातील निवाड्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांनाही वनजमिनीचा मोबदला मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही यावेळी जलसंपदा मंत्र्यांनी दिली. वनसंज्ञेचा प्रश्न सुटल्यानंतर प्रकल्पांना निधीची अडचण येणार नाही, अशी ग्वाही मंत्री महाजन यांनी दिली. यावेळी तिलारीसह इतर प्रकल्पांबाबतही बैठकीत चर्चा झाली. टाळंबाप्रकरणी शिवसेना प्रकल्पग्रस्तांसोबत राहणार असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)