गांधीनगरातील भाजी मंडईचा प्रश्न मार्गी
By Admin | Updated: July 18, 2014 00:50 IST2014-07-18T00:48:40+5:302014-07-18T00:50:34+5:30
जागा ग्रामपंचायतीच्या नावे करण्याचा ठराव : ‘कारभारी’ सदस्याचा डाव फसला

गांधीनगरातील भाजी मंडईचा प्रश्न मार्गी
शिवाजी कोळी - वसगडे
गांधीनगर (ता. करवीर) येथील बहुचर्चित भाजी मंडईची गट नं. २७४१ ही जागा ग्रामपंचायतीच्या नावे व्हावी, असा ठराव झाल्यामुळे भाजी मंडईचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. परिणामी कोट्यवधी रुपयांची मोक्याची जागा गिळंकृत करण्याचा एका ‘कारभारी’ सदस्याचा डाव मात्र फसला आहे.
गांधीनगर येथील शिरूर चौक परिसरात सुमारे चाळीस वर्षांपासून भाजी मंडई भरते. चिंचवाड, वळिवडे, गडमुडशिंगीसह उचगाव परिसरातील शेतकऱ्यांना ही भाजी मंडई आधार आहे. दीडशेवर व्यापारीही भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह चालवितात. येथे कापडाची मोठी बाजारपेठ असल्याने त्याचाही फायदा भाजी विक्रेत्यांना होतो.
ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे मोक्याची जागा लाटण्यासाठी प्रयत्न झाला. मंडईत गटर्स, लाईटची सोय नाही, दोन्ही बाजूंनी अतिक्रमण झाल्याने अगदी अडगळीच्या जागेत व्यापार करावा लागत असल्याच्या व्यापाऱ्यांच्या तक्रारी आहेत. अशातच सन १९९७ पासून गट नं. २७४१ ही जागा एका खासगी मालकाच्या नावे झाल्याची माहिती उघडकीला आल्याचे भाजीपाला व्यापारी मंडळाचे सचिव अमोल एकल यांनी दिली.
गांधीनगर संविधानिक विकास आराखड्यानुसार (सन १९८०) नगर भूमापन क्रमांक २७४३ क्षेत्र २२५-७ चौ. मीटर ही जागा भाजी मंडईसाठी आरक्षित असताना खासगी मालकांची नावे प्रॉपर्टी कार्डला लागल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
व्यापाऱ्यांच्यावतीने अमोल एकल यांनी लढा देत अखेर भाजी मंडईची जागा ग्रामपंचायतीच्या नावे
करण्याचा ठराव मंजूर करण्यास भाग पाडले. ग्रामपंचायतीकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना तसा अहवालही पाठविल्याचे एकल यांनी सांगितले.