‘जनसुराज्य शक्ती’च्या अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह
By Admin | Updated: October 21, 2014 00:19 IST2014-10-21T00:05:01+5:302014-10-21T00:19:53+5:30
ज्या गतीने पक्षाचा विस्तार करणे अपेक्षित होते ते त्यांनी केलेच नाही

‘जनसुराज्य शक्ती’च्या अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यासह राज्यात जनसुराज्य शक्ती पक्षाचा सुपडा साफ उडाला. गेल्या पाच वर्षांत पक्षाची सुरू असलेली वाटचाल पाहता पक्षाच्या अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पक्षाचे प्रभावक्षेत्र असणाऱ्या ‘पन्हाळा-शाहूवाडी’चा गडही पक्षाला राखता आला नाही. विनय कोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपासून फारकत घेत २००४ ला जनसुराज्य पक्षाची स्थापना करत राज्यात सुराज्य आणण्याचा विडा उचलला. या निवडणुकीत त्यांना अपेक्षित यशही मिळाले. कोल्हापुरात तीन, तर सोलापुरात एक अशा चार ठिकाणी पक्षाला यश मिळाले; पण त्यानंतर राष्ट्रवादीला पाठिंबा देत मंत्रिपद पदरात पाडून घेतले. पाच वर्षे मंत्री म्हणून काम करताना ज्या गतीने पक्षाचा विस्तार करणे अपेक्षित होते ते त्यांनी केलेच नाही. परिणामी २००९ च्या निवडणुकीत पक्षाला दारूण पराभव पत्करावा लागला. केवळ विनय कोरे विजयी झाले. या पराभवातून धडा घेत कोरे यांनी पक्षबांधणीत फारसे बदल केले नाहीत. आताच्या निवडणुकीत पक्षाने कोल्हापुरात चार उमेदवार उभे केले होते.
शाहूवाडीतून पक्षाचे संस्थापक विनय कोरे, हातकणंलेतून राजीव आवळे, चंदगडमधून संग्रामसिंह कुपेकर, तर करवीरमधून राजू सूर्यवंशी हे रिंगणात होते. कोरे यांचा निसटता पराभव झाला; पण त्यांच्या इतर तीन उमेदवारांची दाणादाण उडाली. एकंदरीत विनय कोरे यांचा करिश्मा संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)