‘तावडेंचा कान्हा, फसवितो आम्हा’
By Admin | Updated: June 10, 2016 00:13 IST2016-06-10T00:11:52+5:302016-06-10T00:13:56+5:30
शिक्षकांचे भजन : अनुदानासाठीच्या आंदोलनाचा नववा दिवस; आज दशविधी

‘तावडेंचा कान्हा, फसवितो आम्हा’
कोल्हापूर : ‘हा तावडेंचा कान्हा, फसवितो आम्हा’, ‘हे भोळ्या शिक्षका’ अशा गीतांवर टाळांचा गजर, सूरपेटीच्या तालावर प्रतीकात्मक भजन करून अनुदान मागणीसाठी विनाअनुदानित शिक्षकांनी गुरुवारी आंदोलन केले. आंदोलनाच्या दहाव्या दिवशी आज, शुक्रवारी दहा वाजता पंचगंगा नदीघाटावर आंदोलनकर्ते शासनाला दशविधी घालणार आहेत.
राज्यातील अनुदानपात्र ठरलेल्या शाळा व वर्गतुकड्यांना शासनाकडून त्वरित वेतन व अनुदान मिळावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समिती आणि राज्यमान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या नेतृत्वाखाली शिक्षकांचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारात आमरण उपोषण व बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या नवव्या दिवशी गुरुवारी शिक्षकांनी आपल्या मागण्यांबाबत शासनाला जागे करण्यासाठी प्रतीकात्मक भजन केले. यात त्यांनी टाळांचा गजर आणि सूरपेटीच्या तालावर ‘हा तावडेंचा कान्हा, फसवितो आम्हा’, ‘हे
भोळ्या शिक्षका, आवड तुला शिकवायची, शाळेला जायाची’ अशा गीतांच्या माध्यमातून शासनाचा निषेध केला.
आंदोलनात माजी आमदार भगवानराव साळुंखे, कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, गजानन काटकर, प्रकाश पाटील, शिवाजी खापणे, महासंघाचे राज्य उपाध्यक्ष संतोष आयरे, राजेंद्र कोरे, मच्छिंद्र जाधव, प्रेमकुमार बिंदगे, शिक्षकेतर संघटनेचे (शाहूवाडी) एम. के. पोवार, आदी सहभागी झाले होते. अनुदान देण्याचा शासकीय आदेश निघेपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. आंदोलनाच्या नवव्या दिवशी आम्ही प्रतीकात्मक भजन आंदोलन करून शासनाला अनुदान देण्याबाबत सद्बुद्धी द्यावी, असे देवाला साकडे घातले आहे.
आंदोलनातील पुढील टप्पा म्हणून आज, शुक्रवारी सकाळी दहा वाजता पंचगंगा नदीघाटावर शासनाचा दशविधी घालून आंदोलन केले जाणार असल्याचे कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
दोन दिवसांत निर्णय
अनुदानाच्या मागणीबाबत शिक्षक परिषदेच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांच्याशी चर्चा केली असल्याचे माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी सांगितले. ते म्हणाले, अनुदान देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. त्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले असून, दोन दिवसांत अधिकृत निर्णय व शासकीय आदेश होण्याची शक्यता आहे.