ठेकेदारांना काळ्या यादीत घाला
By Admin | Updated: December 17, 2014 23:10 IST2014-12-17T20:33:02+5:302014-12-17T23:10:55+5:30
कुरुंदवाड पालिका सभा : डिजिटल फलक कर; सुधारित पाणी योजनेसह विविध ४८ विषयांना मंजुरी

ठेकेदारांना काळ्या यादीत घाला
कुरुंदवाड : पाण्याच्या टाकीचे काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना पाणी मिळत नाही. ठेकेदारांना मुदतवाढ देऊ नये, त्याचे नाव काळ्या यादीत घाला, अशी मागणी उपनगराध्यक्ष सुरेश कडाळे यांनी केली. ठेकेदारांना पाणीपुरवठ्याचे आप्पासाहेब शेडबाळे हे पाठीशी घालत आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कडाळे व रामचंद्र डांगे यांनी केली. अखेर प्रशासन लिपिक बजरंग ढेरे यांनी कारवाईचे आश्वासन दिले.
शहरातील विविध विकासकामांना मंजुरी देण्यासाठी काल, मंगळवारी नगरपरिषदेच्या सभागृहात विशेष सभा झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष संजय खोत होते. शहरातील डिजिटल फलक कर, पिण्याच्या पाण्याची नवीन टाकी, सुधारित पाणीपुरवठा योजना, विविध प्रभागांत रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसविणे यांसह ४८ विषयांना येथील नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.
शहरात डिजिटल फलक लावण्यासाठी सहा दिवसांसाठी दोनशे रुपये कर त्यानंतर लावल्यास दिवसाला २०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे अल्ट्रासोनिक प्लो मीटर बसविणे, दलित वस्ती विकास योजनेअंतर्गत कोले यांच्या घराजवळ पाण्याच्या टाकीपासून विठ्ठल मंदिरापर्यंत पाईपलाईन टाकणे, शहरातील काही प्रभागांत रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसविणे, एस.पी. हायस्कूल ते दत्त महाविद्यालयापर्यंत रविवारी अतिरिक्त बाजार भरविणे. नगरपरिषद हद्दीतील घनकचरा व्यवस्थापन योजनेअंतर्गत कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प राबविणे यांसह ४८ विषयांना मंजुरी देण्यात आली.
पक्षप्रतोद गणपतराव पोमाजे, रामचंद्र डांगे, दादासाहेब पाटील, बाबासाहेब भबिरे, विलास उगळे, बांधकाम सभापती वैभव उगळे, शरद आलासे, धोंडुबाई बागवान, माधुरी सावगावे, मनीषा डांगे, कमरुन हुक्कीरे, विमल जोंग, कृष्णाबाई मधाळे, मुबिना बागवान यांच्यासह प्रशासन लिपिक बजरंग ढेरे, संजय बत्ते, आर. ई. कुंभार, प्रियांका माने, प्रताप ढोणे, आप्पासाहेब शेडबाळे, नामदेव धातुंडे उपस्थित होते. (वार्ताहर)