‘स्वाभिमानी’ला दे धक्का..!
By Admin | Updated: October 20, 2014 00:40 IST2014-10-19T23:42:03+5:302014-10-20T00:40:10+5:30
सगळीकडेच वाताहत : संघटना उरली केवळ आंदोलनापुरती

‘स्वाभिमानी’ला दे धक्का..!
विश्वास पाटील - कोल्हापूर -लोकसभा निवडणुकीत स्वत:चा करिश्मा निर्माण करून देशभर चर्चेत आलेल्या खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मात्र विधानसभा निवडणुकीत वाताहत झाली. कोल्हापूर जिल्ह्यात संघटनेने पाच जागा लढविल्या होत्या. त्यापैकी एकाही मतदारसंघात त्यांचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर नाही. याचा अर्थच असा की लोक ऊस आंदोलनापुरते संघटनेचा झेंडा हातात घेतात, परंतु निवडणुकीत मात्र त्यांना हव्या असलेल्या झेंड्याच्या मागे जातात. स्वाभिमानी संघटनेचा विचार करता या निवडणुकीत त्यांच्या सगळ््या वजाबाक्याच झाल्या आहेत.
शिरोळ हा शेट्टी यांचा प्रभाव असलेला मतदारसंघ. विधानसभेच्या २००४च्या निवडणुकीत ते पहिल्यांदा निवडणूक लढवूनही मातब्बरांचा पराभव करून विजयी झाले. परंतु त्यानंतरच्या दोन्ही निवडणुकीत त्यांना आपल्या वारसदारांना विजयी करता आले नाही. या निवडणुकीत त्यांनी संघटनेच्या उमेदवारीचे नैसर्गिक हक्कदार उल्हास पाटील यांना बाजूला करून सावकर-मादनाईक यांना उमेदवारी दिली. शेट्टी यांनी आपल्या जातीच्या माणसाला उमेदवारी दिल्याचा प्रचार त्यातून झाला.
महायुतीच्या राजकारणात शेट्टी भाजपच्या बाजूने राहिल्याचा राग म्हणून शिवसेनेने संघटनेचे बंडखोर उल्हास पाटील यांना लगेच उमेदवारी दिली. तिथे संघटनेचा हिशेब चुकता करण्यासाठी अनेक गट एकत्र आल्याने संघटनेचा दारूण पराभव झाला. लोकसभेला शेट्टी यांना मताधिक्य देणाऱ्या या मतदारसंघात विधानसभेला मात्र पराभव झाला. शेट्टी व काँग्रेसचे पराभूत आमदार
सा. रे. पाटील यांच्यात मिलीभगत असल्याचा प्रचारही संघटनेस अडचणीचा ठरला.
शाहूवाडीत शेट्टी यांना विनय कोरे व शिवसेनेच्या सत्यजित पाटील यांना पराभूत करायचे होते. परंतु त्यात त्यांना निम्मेच यश आले. सत्यजित पाटील यांना ते रोखू शकले नाहीत. राधानगरी मतदारसंघात मात्र जालंदर पाटील यांना मानहानीकारक पराभवास सामोरे जावे लागले. पाटील हे जिल्हाध्यक्ष असूनही त्यांना कशी-बशी सहा हजार मते मिळाली, तशीच स्थिती चंदगडला राजेंद्र गड्ड्याण्णावार यांची झाली.
पोटनिवडणुकीनंतर आपण आमदार झालोच, अशा अविर्भावात राहिलेल्या गड्ड्याण्णावार यांचाही मोठा पराभव झाला. जिल्ह्यात स्वाभिमानीचे उमेदवार पराभूत झाले असले तरी कोल्हापूर दक्षिणमध्ये मात्र अमल महाडिक यांच्या विजयासाठी संघटनेची चांगली मदत झाली.
'स्वाभिमानी'च्या उमेदवारांना मिळालेली मते
अनिल मादनाईक (शिरोळ) - ४८ हजार ५११ (तिसऱ्या स्थानावर)
अमरसिंह पाटील (शाहूवाडी) - २७ हजार ८६६ (तिसऱ्या स्थानावर)
जालंदर पाटील (राधानगरी) - ५ हजार ९१५ (तिसऱ्या स्थानावर)
राजेंद्र गड्ड्याण्णावार (चंदगड)- १९ हजार ८४७ (सहाव्या स्थानावर)
प्रमोद कदम (हातकणंगले) - २१ हजार ३१८ (चौथ्या स्थानावर)