पुरेपूर कोल्हापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:30 IST2020-12-30T04:30:45+5:302020-12-30T04:30:45+5:30

‘समाधानाचा मार्ग पोटातून जातो,’ असं म्हणतात. कोल्हापुरात असं समाधान देणारी अनेक ठिकाणे खवय्यांच्या सेवेत कार्यरत आहेत. कोल्हापूर हे केवळ ...

Purepur Kolhapur | पुरेपूर कोल्हापूर

पुरेपूर कोल्हापूर

‘समाधानाचा मार्ग पोटातून जातो,’ असं म्हणतात. कोल्हापुरात असं समाधान देणारी अनेक ठिकाणे खवय्यांच्या सेवेत कार्यरत आहेत. कोल्हापूर हे केवळ एक जिल्हास्तरीय धार्मिक, ऐतिहासिक ठिकाण आहे; म्हणूनच इथं हॉटेल्सची संख्या अधिक आहे, अशातील भाग नाही; तर कर्नाटक, कोकण आणि गोवा यांना जोडणारे महत्त्वाचे केंद्र म्हणून कोल्हापूरकडे पाहिले जाते. त्यामुळे कोल्हापूरला भौगोलिकदृष्ट्या चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

कोल्हापूर शहरामध्ये भिन्न संस्कृती, भाषा, आचार, विचार असणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे खाण्यापिण्याच्या इथल्या रीतींमध्ये आणि पदार्थांमध्येही तितकेच वैविध्य असल्याचे आपल्याला दिसून येते. बेळगाव आणि परिसरातील अनेकजण कोल्हापूरमध्ये नोकरीच्या निमित्ताने स्थायिक झालेले आहेत. कोकणातील अनेकजण उद्योगाच्या निमित्ताने कोल्हापुरात आले आणि आज अतिशय चांगल्या परिस्थितीत ही मंडळी कोल्हापूरमध्ये सुखात राहत आहेत.

तिरूपतीला गेलेले अनेक भाविक कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी येतात. यांतील अनेकजण शाकाहारी जेवणाला प्राधान्य देतात. तसेच शाकाहारींची संख्याही वाढत असल्याने बहुतांश हॉटेलमध्ये आता शाकाहारीलाही त्याच पद्धतीने प्राधान्य दिले जात आहे. दुसरीकडे, जैन थाळीसारखे प्रकारही येथे उपलब्ध आहेत. फाईव्ह स्टारपासून ते टू, थ्री स्टारची हॉटेल्स कोल्हापूरमध्ये उपलब्ध असल्याने पर्यटकही कोल्हापूरला प्राधान्य देत आहेत. गोव्याकडे किंवा कोकणाकडे, बंगलोरला जातानाचा एक मुक्काम कोल्हापूरला करण्याकडे पर्यटकांचा कल वाढत आहे. त्यामुळे त्यांना त्याच पद्धतीची सेवा देणारी हॉटेल्सही कोल्हापुरात गेल्या १० वर्षांत उभी राहिली आहेत.

कोल्हापूरचे अनेक पदार्थ इतर राज्यांतील पर्यटक आणि नागरिकांच्याही पसंतीस उतरले आहेत. यांतील अनेक पदार्थ परदेशीही पाठविले जातात. कोल्हापूरची भडंग, भेळ अशीच लोकप्रिय. जरा झणझणीत असलेले इथले भडंग तोंडाला चव आणते. इथल्या सुक्या भेळीचीही पाकिटे अनेकजण परदेशात जाताना सोबत घेऊन जातात.

कोल्हापूरच्या ‘मिसळ’चे तर अनेकांना अप्रुप. कोल्हापुरात मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोल्हापुरी मिसळेवर ताव मारल्याशिवाय पर्यटकांनाही चैन पडत नाही. लालभडक तवंग असलेली, दही घातलेली, कांदा पेरलेली, शेव पसरलेली, बटाट्याची भाजी मिसळलेली ही मिसळ खाल्ल्यानंतर जरा नाकातोंडातून पाणी आले की खाणारा तरतरीत होतो. त्यानंतर कपभर फक्कड चहा घेतल्यानंतर घसा चरचरला की मग मिसळ खाल्ल्याची अनुभूती पूर्ण होते.

सॅँडविचपासून ते पाणीपुरीपर्यंतचे सगळे प्रकार इथे मिळतात. आइस्क्रीमच्या दुकानांची संख्याही वाढत चालली आहे. इराणी चहा-बिस्कीटदेखील आता इथं मिळायची सोय झाली आहे. आख्खा मसूर आता लोकप्रिय झाला आहे. पिझ्झा, बर्गरच्या प्रसिद्ध कंपन्यांनी दुकानं थाटली आहेत. बासुंदीपासून गवती चहापर्यंतचा चहाही उपलब्ध आहे. थोडक्यात, चवीचं खायची ज्याला हौस आहे, त्यानं दोन दिवस काढून कोल्हापुरात यायलाच हवं, यात शंका नाही.

............................

कोल्हापूर हॉटेल मालक संघाचा पुढाकार

कोल्हापूरचे पर्यटन विश्व व्यापक व्हावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर हॉटेल मालक संघाने सातत्यपूर्ण परिश्रम घेतले आहेत. विविध फेस्टिव्हलच्या निमित्ताने पर्यटकांसाठी सवलतीच्या योजना असोत किंवा महाराष्ट्रातील टुर ऑपरेटर्सकरिता तीन दिवसांच्या विशेष पॅकेजचे आयोजन असो. या सगळ्यांमध्ये कोल्हापूर हॉटेल मालक संघ अगदी हिरिरीने पुढे असतो.

टुरिस्ट गाईड तयार करण्यापासून ते विविध व्याख्याने, चर्चासत्रे, अन्य शहरांत, राज्यांत, देशात कोल्हापूरचे ब्रॅँडिंग करण्यासाठी जे जे करणे आवश्यक आहे, ते ते करण्यासाठीची सकारात्मक भूमिका या संस्थेने घेतली आहे. केवळ कोल्हापूर शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील पर्यटनस्थळांचा अभ्यास करून स्थानिकांनाही या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची संघाची भूमिका कौतुकास्पद आहे.

- समीर देशपांडे

Web Title: Purepur Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.