कोल्हापूर : गोकुळ दूध संघाने हीरकमहोत्सवानिमित्त दूध संस्थांना दिलेल्या जाजम व घड्याळाची खरेदी जाहीर निविदा न काढता, केवळ कोटेशनने सुमारे ३ कोटी ७४ लाखांची केलेली खरेदी बेकायदेशीर असल्याचा आरोप उद्धवसेनेच्या वतीने करण्यात आला. खरेदीसह पशुखाद्य वाहतुकीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून संचालक मंडळावर कलम ८८ नुसार कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी दुग्ध विभागाकडे केली.उद्धवसेनेचे उपनेते संजय पवार व सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची भेट घेतली.उपनेते संजय पवार म्हणाले, दूध उत्पादकांच्या घामावर ‘गोकुळ’ उभा आहे. मात्र, पशुखाद्य वाहतूकीमध्ये अपहार झाला, तो संचालकांनी आपापसांत मिटविला. यातील छोट्या माशांवर कारवाई केली, त्यावेळीच जबाबदार व्यक्तीवर कारवाई झाली असती तर असे धाडस केले नसते.सहसंपर्क प्रमुख विजय देवणे म्हणाले, सहकारात किती रकमेपर्यंतची खरेदी कोटेशनने करायची हे ठरलेले आहे. ‘गोकुळ’ने पावणे चार कोटींची खरेदी केवळ कोटेशनवर कशी केली ? त्याला संचालक मंडळ जबाबदार असून, याविरोधात आम्ही कारवाईची मागणी करणार आहे.मागणीचे निवेदन कार्यकारी संचालक डॉ. गोडबोले यांना दिले. दरम्यान, सहायक निबंधक (दुग्ध) विभागाकडेही त्यांनी चौकशीची मागणी केली. जिल्हाप्रमुख संजय चौगुले, वैभव उगळे, उपजिल्हाप्रमुख सुरेश पोवार, बाजीराव पाटील, अवधूत साळोखे, तालुकाप्रमुख तानाजी आंग्रे, विराज पाटील, भरत आमते, शशिकांत बिडकर, स्मिता सावंत, पूनम फडतरे, कमल पाटील, नवेज मुल्ला, रियाज समंजी, चंगेजखान पठाण, संजय खाडे, युवा सेना जिल्हाप्रमुख मंजित माने, राहुल माळी, आदी उपस्थित होते.
मग शेतकऱ्यांनी बघायचे कोणाकडे ?‘गोकुळ’मध्ये आता सत्ताधारी आणि विरोधक एक झाल्याचा हा परिणाम आहे. पण, आता दूध उत्पादक शेतकऱ्यांनी बघायचे कोणाकडे ? असा सवाल संजय पवार यांनी उपस्थित केला.
लेखी उत्तर आठ दिवसांत‘गोकुळ’मध्ये जाहीर टेंडरने नव्हे, तर कोटेशनने खरेदी करण्याचा अधिकार संचालक मंडळाला आहे, असे उत्तर कार्यकारी संचालक डॉ. गोडबोले यांनी दिल्यानंतर तसे लेखी द्या, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावर, लेखापरीक्षकांशी बोलून आठ दिवसांत लेखी देण्याचे आश्वासन डॉ. गोडबोले यांनी दिले.