भात खरेदी केंद्राला ‘ब्रेक’
By Admin | Updated: November 27, 2014 00:11 IST2014-11-26T23:29:02+5:302014-11-27T00:11:42+5:30
हमीभावही कमी : उत्पादकांच्या हाती कोंडाच, गतवर्षीपेक्षा अल्प प्रतिसाद

भात खरेदी केंद्राला ‘ब्रेक’
भीमगोंडा देसाई - कोल्हापूर --जिल्ह्यात भात खरेदी केंद्र सुरू करण्याला अडथळ्यांचा ब्रेक लागत आहे. परिणामी, व्यापाऱ्यांच्या लूटमारीला बळी पडून भात उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती ‘कोंडा’च शिल्लक राहत आहे. तालुका पातळीवरील बाजार समिती, कृषिसंबंधी संस्था, खरेदी-विक्री संघ केंद्र सुरू करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
खरीप हंगामात शाहूवाडी, चंदगड, पन्हाळा, राधानगरी, आजरा या भागांत भात पीक अधिक असते. यंदा भाताचा हमीभाव १३६० रुपये प्रतिक्विंटल आहे; पण व्यापारी ८०० ते ११५० रुपये अशा दराने ते खरेदी करीत आहेत. वजनकाट्यातही फेरफार करून फसवणूक केली जात आहे. यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. यामुळे शासनाकडूनच १ नोव्हेंबरपासून भातपट्ट्यामध्ये खरेदी केंद्र सुरू करण्याचा आदेश मार्केटिंग फेडनरेशनला देण्यात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेवेळी जिल्हाधिकारी यांनी भात खरेदी केंद्र सुरू करण्याचा आदेश दिला आहे; पण प्रत्यक्षात केंद्र सुरू करताना अनेक अडचणी येत आहेत. वेळोवेळी पाठपुरावा करूनही केंदे्र चालू होत नाहीत.
गेल्यावर्षी जिल्ह्यातील दोन केंद्रांत फक्त एक हजार २२ क्विंटल भात संकलित झाले होते. यशवंतनगर येथे चंदगड तालुका खरेदी-विक्री संघाने भात खरेदी केंद्र सुरू केले. या केंद्रात ८०० क्विंटल भातखरेदी झाली. बांबवडे (ता. शाहूवाडी) तालुका खरेदी-विक्री संघातर्फे सुरू केलेल्या केंद्रात १४७ क्विंटल भात खरेदी केले. हमीभावाप्रमाणे पंधरा दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले. खरेदी केलेल्या भाताचे तांदूळ करून जिल्हाधिकारी यांच्या ताब्यात दिले; परंतु, केंद्रात शेतकऱ्यांना भात देण्यासाठी भातपिकाची नोंद असलेला सातबारा दाखविणे बंधनकारक आहे. स्वच्छ, चांगला वाळलेला, आर्द्रता कमीची अट, केंद्रापर्यंतची करावी लागणारी वाहतूक यांमुळे शेतकरी दारात आलेल्या व्यापाऱ्यास आपला भात देणे पसंत करतो.
भात अधिक पिकणाऱ्या तालुक्यात केंद्र सुरू करण्यासंबंधी पत्रव्यवहार केला आहे; पण यशवंतनगर वगळता कोणाकडूनही प्रतिसाद मिळालेला नाही. गोडावून नसणे, कमिशन कमी असणे, आदींमुळे केंद्र सुरू करण्याकडे तालुका, खरेदी-विक्री संघ दुर्लक्ष करीत असतात. केंद्रावर भात दिल्यास पैसे बँक खात्यावर जमा होतात. वाहतूक स्वत: करावी लागते. सात-बारा बंधनकारक आहे. आर्द्रता कमी असावी लागते, या कारणांमुळे शेतकरी भात विक्री केंद्राकडे पाठ फिरवितो.
- एम. एम. पाटील, फेडरेशनचे जिल्हा
मार्केटिंग अधिकारी
खुल्या बाजारापेक्षा हमीभाव कमी मिळतो. हमीभावासंंबंधी बहुतांश शेतकरी अनभिज्ञ आहे. गरजेवेळी व्यापाऱ्यांकडून उत्पादकाने पैसे घेतलेले असतात. या मोबदल्यात भात त्या व्यापाऱ्यास विकला जातो. यामुळे केंद्रांना कमी प्रतिसाद मिळतो. हमीभाव वाढवून जाचक अटी शिथिल केल्यास शेतकरी केंद्रात भात देण्यास तयार आहे.
- नितीन पाटील, बेळेभाट,
ता. चंदगड, भात उत्पादक शेतकरी)
हमीभाव कमी असल्याने उदासीनता
यंदा महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडतर्फे केंद्र सुरू करण्यासाठी आठवड्यापूर्वी बाजार समिती, खरेदी-विक्री संघांना पत्र दिले आहे. मात्र, यशवंतनगर वगळता सर्व बाजार समित्यांनी त्याला प्रतिसाद दिलेला नाही. तसेच हमीभावच कमी असल्याने केंद्रासंबंधी शेतकरीही आग्रही नाही.