पुरंदरे यांचा ‘महाराष्ट्र भूषण’ रद्द करा
By Admin | Updated: June 3, 2015 01:06 IST2015-06-03T00:27:32+5:302015-06-03T01:06:15+5:30
मनोज आखरे : संभाजी ब्रिगेड व्यापक लढा उभारणार

पुरंदरे यांचा ‘महाराष्ट्र भूषण’ रद्द करा
कोल्हापूर : बाबासाहेब पुरंदरे यांना राज्य शासनाने जाहीर केलेला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार रद्द करावा, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. त्याबाबत शासनाला वारंवार निवेदने दिली, आंदोलने केली. तसेच शासनाला या पुरस्काराबाबत फेरविचार करण्यास सांगितले असून पुरस्कार रद्द करावा, या मागणीसाठी व्यापक लढा उभारण्यात येणार असल्याची माहिती ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
प्रदेशाध्यक्ष आखरे म्हणाले, महाराष्ट्रातील साहित्य, कला-क्रीडा, विज्ञान, समाजप्रबोधन, पत्रकारिता, लोकप्रशासन आणि आरोग्य सेवा, आदी क्षेत्रांत एकनिष्ठेने, प्रदीर्घ काळ सेवा केलेल्या मान्यवर व्यक्तींच्या कार्याचा यथोचित सन्मान करण्यासाठी शासनातर्फे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यात येतो. मात्र, बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर केलेला पुरस्कार हा निकषात बसत नाही. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात येऊ नये, अशी आमची ठाम मागणी आहे. या मागणीसाठी सभा, परिषदा, आदींच्या माध्यमातून लढ्याबाबत जनजागृती केली जाईल. त्यासाठी किल्ले रायगड येथे शनिवारी (दि. ६) होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात शपथ घेण्यात येणार आहे.
पत्रकार परिषदेस ब्रिगेडचे प्रवक्ते श्रीमंत कोकाटे, प्रदेश उपाध्यक्ष हिंदुराव हुजरे-पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, संपत चव्हाण, प्रवीण पाटील, सुनील पाटील, बाजीराव दिडे, आदी उपस्थित होते.
कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढविणार
ज्या पद्धतीने आम्ही महामानवांचा खरा इतिहास सांगतो, प्रबोधन करतो, तरुण, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलने करतो, त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. त्यामुळे आगामी कोल्हापूर मनपा निवडणुकीत समविचारी संघटना, पक्ष यांना बरोबर घेऊन संभाजी ब्रिगेड निवडणूक लढविणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष आखरे यांनी सांगितले.