राष्ट्रीय महिला रस्सीखेच स्पर्धेत पंजाबचे वर्चस्व
By Admin | Updated: November 11, 2016 23:40 IST2016-11-11T23:40:29+5:302016-11-11T23:40:29+5:30
१७ राज्यांतून ३४ संघांचा सहभाग : केरळ, दिल्ली दुसऱ्या स्थानावर; कुडित्रेच्या डी. सी. नरके विद्यानिकेतन येथे स्पर्धा

राष्ट्रीय महिला रस्सीखेच स्पर्धेत पंजाबचे वर्चस्व
कोपार्डे : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी कारखान्यावरील डी. सी. नरके विद्यानिकेतनच्या मैदानावर १८ वी सबज्युनिअर व २९ वी ज्युनिअर राष्ट्रीय महिला रस्सीखेच स्पर्धा पार पडली. यात १७ राज्यांना पिछाडीवर टाकत पंजाबने या स्पर्धेत अव्वलस्थान पटकाविले. केरळ व दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर राहिले. महाराष्ट्राची कामगिरी निराशाजनक झाली.
ही स्पर्धा चार दिवस सुरू होती. विविध राज्यांतून जवळजवळ ४५० मुलींनी सहभाग घेतला. नेपाळ रस्सीखेच संघटनेचे अध्यक्ष दोरोजी लामा यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. राष्ट्रीय शरीरसौष्ठव असोसिएशनचे सदस्य बिभीषण पाटील यांच्या मार्गर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे बक्षीस वितरण कुंभी-बॅँकेचे अध्यक्ष अजित नरके यांच्या हस्ते झाले. यावेळी कोल्हापूर जिल्हा रस्सीखेच संघटनेच्या अध्यक्षा माधवी पाटील, नेपाळचे संघटना सचिव केशव गौतम, दिल्ली तांत्रिक कमिटीचे अध्यक्ष मदन मोहन, दया कावरे, विवेकानंद हिरेमठ, पांडुरंग पाटील उपस्थित होते.
या स्पर्धेत विविध गटांत पंजाब संघाने प्रतिस्पर्धी संघावर आक्रमक चढाया करीत आघाडी घेतली होती. केरळ व दिल्ली वगळता कोणत्याही राज्याच्या संघाला पंजाबविरुद्ध ताकद दाखविता आली नाही. सब ज्युनिअर गटात १३ वर्षांखालील ३४० किलो वजनी गटात केरळ प्रथम, तर दिल्ली द्वितीय व तेलंगणा तृतीय स्थानावर राहिला.
१५ वर्षांखालील ३६० किलो वजनी गटात प्रथम- पंजाब, द्वितीय केरळ, तृतीय दिल्ली असे विजय झाले. १७ वर्षांखालील ४०० किलो वजनी गटात अनुक्रमे विजेते दिल्ली, केरळ, पंजाब, १७ वर्षांखालील ४२० किलो वजनी गटात अनुक्रमे विजेते पंजाब, केरळ, महाराष्ट्र संघ राहिला.
ज्युनिअर गटात १९ वर्षीय ४४० किलो वजनी गटात विजेते : प्रथम पंजाब, द्वितीय केरळ, तृतीय क्रमांक दिल्ली संघाने पटकाविला, तर ज्युनिअर गटात १९ वर्षांखालील ४६० किलो वजनी गटात विजेते अनुक्रमे : प्रथम दिल्ली, द्वितीय पंजाब, तृतीय क्रमांक केरळ संघाने पटकाविला.
यावेळी माधवी पाटील म्हणाल्या, एप्रिल २०१७ मध्ये होणाऱ्या आशियाई रस्सीखेच स्पर्धेत सहा देशांचा सहभाग असणार आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकावर असणाऱ्या संघाची आशियाई रस्सीखेच स्पर्धेसाठी निवड होणार आहे. २०२०ला होणाऱ्या आॅलिम्पिकमध्ये या खेळाचा समावेश होणार आहे.
सब ज्युनिअर गटातील १७ वर्षांखालील महिला रस्सीखेच स्पर्धेतील विजेत्यांना कुंभी बॅँकेचे अध्यक्ष अजित नरके यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. यावेळी बिभीषण पाटील, माधवी पाटील, दोरोजी लामा, केशव गौतम उपस्थित होते.