अहंकार चढलेल्यांना खाली खेचा
By Admin | Updated: October 9, 2014 00:18 IST2014-10-09T00:14:31+5:302014-10-09T00:18:03+5:30
स्मृती इराणी : राज्यात महिला असुरक्षित असल्याचीही टीका

अहंकार चढलेल्यांना खाली खेचा
कोल्हापूर : प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षांचा वनवास भोगला. महाराष्ट्राच्या जनतेने कॉँग्रेस-राष्ट्रवादी राजवटीत पंधरा वर्षे वनवास भोगला. म्हणूनच अहंकाराची परिसीमा गाठलेल्या या राजवटीला सत्तेवरून खाली खेचा, असे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज, बुधवारी येथे केले. ज्या राज्यात महिला पोलीस सुरक्षित राहू शकल्या नाहीत, तेथे सर्वसामान्य महिला तरी कशा सुरक्षित राहू शकतील? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
भाजपचे कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक व कोल्हापूर उत्तरचे उमेदवार महेश जाधव यांच्या प्रचारार्थ संभाजीनगरातील पटांगणावर आयोजित केलेल्या सभेत स्मृती इराणी बोलत होत्या.
ज्या शेतकऱ्यांच्या जिवावर कॉँग्रेस, राष्ट्रवादीने सत्ता मिळविली, त्या शेतकऱ्यांवर त्यांनी लाठीहल्ले केले, गोळीबार केला. राज्यात कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या; पण त्यांना कोणतीही मदत केली नाही. उलट पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवारांनी अपमानित केले. अशा अहंकार चढलेल्यांना घरात बसवायची वेळ आली आहे, असे इराणी म्हणाल्या.
इराणी यांनी कोल्हापूर शहराला पर्यटनाचा दर्जा का दिला नाही, राज्यातील जनतेला चोवीस तास वीज का दिली नाही, गरीब कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा का प्रयत्न केला नाही, असे सवाल उपस्थित केले. अरुंधती महाडिक म्हणाल्या, महाडिक निवडणुकीस उभारतात काहींना पक्षनिष्ठा आठवते; परंतु पक्षात असूनही तुम्ही विरोध करता त्यावेळी तुमची पक्षनिष्ठा कोठे जाते? धनंजय महाडिक निवडून गेल्यानंतर त्यांनी चांगली कामे करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, परंतु चांगल्या कामांसाठी राज्य सरकारची एनओसी देण्यात आमचे मंत्री आडवे पडले, असा आरोपही त्यांनी केला.
यावेळी आमदार संजय पाटील, महेश जाधव, अमल महाडिक, राजेंद्र ठाकूर, शैलजा पाटील यांची भाषणे झाली. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, राजलक्ष्मी खानविलकर, रामभाऊ चव्हाण, आदी उपस्थित होते.
तुमचे कसलेच श्रेय नाही
धनंजय महाडिक यांना खासदारपदी निवडून आणण्यात मंत्र्यांचे श्रेय आहे असा दावा केला जातो; पण असा दावा कोणी करू नये. महाडिक स्वत:च्या ताकदीवर व कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेच्या जिवावर निवडून आले आहेत, असा दावाही अरुंधती महाडिक यांनी केला. निवडणुकीच्या तोंडावर महाडिकांवर गुंडगिरीची टीका केली जाते, पण ती खोटी आहे. आम्ही घरंदाज असून, घरात तसेच समाजातही स्त्रियांचा सन्मान करण्याची महाडिक कुटुंबीयांची परंपरा असल्याचे त्या म्हणाल्या.