दिवसा प्रचार... रात्री छुपा ‘बार’!

By Admin | Updated: October 31, 2015 00:11 IST2015-10-30T00:06:22+5:302015-10-31T00:11:41+5:30

गल्लीबोळांत निवडणुकीचे वारे : दुचाकी, दागिने, लाखोंच्या देणग्यांची उधळण; हॉटेल्स हाऊसफुल्ल

Publicity in the day ... hiding the night 'bar'! | दिवसा प्रचार... रात्री छुपा ‘बार’!

दिवसा प्रचार... रात्री छुपा ‘बार’!

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीच्या जाहीर प्रचाराचा कालावधी आता काही तासांचा राहिला आहे. त्यामुळे शेवटच्या महत्त्वपूर्ण टप्प्यात दिवसभराच्या प्रचारासोबत तडजोडी सुरू झाल्या आहेत. वैयक्तिक मतदारांसह शहरातील मंडळांच्या कार्यकर्त्यांशीही रात्रीच्या वेळी चर्चा, तडजोडी होऊ लागल्या असून, लाखोंचा व्यवहार होताना पाहायला मिळत आहे. ज्या प्रभागात अधिक चुरस आहे, अशा ‘मनी पॉवर’ उमेदवारांच्या प्रभागात तर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नुसता आकडा सांगायचा आणि त्याची पूर्तता करायची, अशीच परिस्थिती आहे. दरम्यान, शहरातील तसेच शहरालगतची हॉटेल्स, खानावळी हाऊसफुल्ल होत आहेत.
महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारातील शेवटच्या दोन दिवसांत देणं-घेणं सुरू झालं आहे. उमेदवार व त्यांचे काही ‘विश्वासू समर्थक’ रात्रीच्या वेळी अशा बोलण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे. त्यातून काही मजेदार आणि धक्कादायक किस्सेही ऐकायला मिळत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका प्रभागात एका उमेदवाराने ‘दहा मतदारांमागे एक दुचाकी वाहन’ अशी आकर्षक योजना पुढे आणल्याची चर्चा आहे. ज्यांच्या कुटुंबात दहा मतदार आहेत, त्या मतदारांच्या कुटुंबप्रमुखाच्या नावावर असे वाहन दिले जाते. अशा दहा वाहनांचे वाटप झाल्याचेही सांगण्यात येते. एका प्रभागातील ‘मनी पॉवर’ उमेदवाराने परिसरात चक्क तीन बोअरिंग मारून दिली. या बोअरिंगला पाणी लागले आणि मतदारही खूश झाले.
मध्यवस्तीतीलच एका प्रभागात असलेल्या अपार्टमेंटमधील मतदारांनी ६२ मतांसाठी चक्क ३ लाख १० हजार रुपयांचा सौदा केला. उमेदवाराने कसलेही आढेवेढे न घेता त्या मतदारांची मागणी क्षणात पूर्ण केली. त्याच प्रभागात एक मंडळाला दहा लाखांची देणगी दिल्याची, तर एका मंडळास दहा किलो चांदी भेट देण्यात आल्याची चर्चा आहे.
उपनगरांत जेव्हा उमेदवार मतदारांच्या दारात जातात तेव्हा अनेक प्रकारची कामे सांगून ती करून घेतली जात आहेत. गटारी, रस्ते करून देण्याबरोबरच नळे टाकून देण्याची मागणी केली जाते. एवढेच नव्हे तर
-/पान ४ वर

पहाटेपर्यंत प्रमुख कार्यकर्त्यांची खलबते
महानगरपालिकेतील उमेदवारांचा कौल लागण्यास अवघे तीन दिवस शिल्लक राहिल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांच्या रात्री जागू लागल्या असून, प्रभागात पहाटेपर्यंत प्रमुख कार्यकर्त्यांची खलबते सुरू झाले आहेत.
प्रत्येक प्रचार कार्यालयात कार्यकर्ते उमेदवारांची यादी घेऊन कोणाच्या संबंधित मतदार आहेत, कोणामार्फत त्यांच्याशी संपर्क साधायचा, या गोष्टींच्या नियोजनात मग्न आहेत; तर काही मतदार नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहत असल्याने त्यांची भेट घेण्यासाठी २०० ते ३०० किलोमीटरचा प्रवास करून कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत. या प्रचार यंत्रणेला जोर लावण्यासाठी उमेदवारांनी आपल्या नातेवाइकांना बोलावून घेतल्याने उमेदवारांच्या घरी लगीन घाईचेच चित्र आहे.
चोवीस तास सोशल मीडियावर असणारी तरुण पिढी आपल्या उमेदवाराच्या डिजिटल प्रचारासाठी सरसावली आहे. ती रात्रभर व्हॉटस अ‍ॅप, मेसेज, फेसबुक, आदींमार्फत मतदारांशी संपर्क साधत आहेत.
प्रचार कार्यालयात गर्दी ओढण्यासाठी काही उमेदवारांनी चक्क आपल्या कार्यालयांत वायफायची विशेष व्यवस्था केली आहे. यामुळे अनेक तरुण दिवसरात्र प्रचार कार्यालयात बसून सोशल मीडियावर प्रचार करण्याबरोबरच गेम, अ‍ॅप्स डाउनलोड करीत असल्याचे दिसत आहे.
काहीजणांना आपल्या व्यवसायामुळे, तर काही प्रभागांतील उमेदवारांच्या दहशतीमुळे किंवा हितसंबंधित दुखावतील, या उद्देशाने उघडपणे प्रचारात फिरता येत नाही, असे कार्यकर्ते पडद्याआड राहून आपली यंत्रणा हलवीत असल्याचे चित्र दिसत आहे.


शिट्टी कुणाची वाजणार...? कोल्हापूर महापालिका निवडणुकीतील अपक्ष उमेदवारांना वेगवेगळी चिन्हे मिळाली आहेत. अनेक उमेदवारांना ‘शिट्टी’ हे चिन्ह मिळाले आहे. बुधवारी मंगळवार पेठेतील एका उमेदवाराने चक्क कार्यकर्त्यांना शिट्ट्या देऊनच प्रचारफेरी काढली. शिट्ट्या वाजवत सुरू असलेली प्रचारफेरी पाहून महापालिका निवडणुकीत कुणाच्या विजयाची शिट्टी वाजणार, अशी चर्चा त्या परिसरात सुरू होती.

Web Title: Publicity in the day ... hiding the night 'bar'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.