दलबदलूंना जनता धडा शिकवेल
By Admin | Updated: August 26, 2014 23:11 IST2014-08-26T23:09:46+5:302014-08-26T23:11:04+5:30
हसन मुश्रीफ : मुरगूडमध्ये हुतात्मा भारमल, विश्वनाथ पाटील यांच्या पुतळ्याच्या कामास प्रारंभ

दलबदलूंना जनता धडा शिकवेल
मुरगूड : निवडणुकीची सुगी आल्यानंतरच जनतेसमोर आलेल्या माझ्या विरोधी उमेदवारांनी अपक्ष, कॉँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी संघटना असा सात वेळा वेगवेगळा घरोबा केला आहे. स्वार्थासाठी दलबदलूपणा करणाऱ्यांना कागलची जनताच धडा शिकवेल, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
मुरगूड (ता. कागल) येथे नगरपरिषदने बांधलेल्या हुतात्मा तुकाराम भारमल शॉपिंग कॉम्प्लेक्स व विश्वनाथराव पाटील खुले नाट्यगृहाच्या नामकरण व सत्कार समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार के. पी. पाटील होते. यावेळी हसन मुश्रीफ यांना चांदीची मूर्ती, शाल व श्रीफळ देऊन रणजितसिंह पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या निमित्ताने मंत्री मुश्रीफ, आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, रणजितसिंह पाटील, प्रवीणसिंह पाटील यांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. नगरपरिषदेच्या प्रांगणात सहकारमहर्षी विश्वनाथराव पाटील, तर तुकाराम चौकामध्ये हुतात्मा तुकाराम भारमल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाचा प्रारंभ मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.
मुश्रीफ म्हणाले, गत विधानसभा निवडणुकीत आपल्याबरोबर तालुक्यातील कोणताच बडा नेता नव्हता. त्यावेळी मुरगूडच्या पाटील बंधूंनी आपल्याला हत्तीचे बळ दिले.
आमदार के. पी. पाटील म्हणाले, विरोधक पसरवत असलेला जातीयवाद समूळ नष्ट करण्यासाठी कागलकरांनी पुन्हा एकदा पुरोगामित्व सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे. काम करणाऱ्या माणसांना संधी द्या.
माजी खासदार मंडलिक व संजयबाबा यांच्यावर टीका करताना रणजितसिंह पाटील म्हणाले, ज्यांनी आयुष्यभर कोणाचा पुतळा उभा केला नाही, कुणाला पैची मदत केली नाही, त्यांना जनतेची काय जाण असणार? खऱ्या अर्थाने कागलचे पुरोगामित्व वाढवण्यासाठीच मुश्रीफांनी गावागावांतील मंदिरांची रूपे पालटली. सर्वधर्मियांना समान न्याय दिला. जर कुणी जातीयवाद पुढे करून निवडणूक जिंकण्याचे मनसुबे आखत असेल तर ते उधळून लावू.
यावेळी माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, डी. डी. चौगले, वसंतराव शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास भैया माने, कागलच्या नगराध्यक्षा आशाकाकी माने, युवराज पाटील, ‘बिद्री’चे संचालक गणपतराव फराकटे, पंडितराव केणे, डी. एम. चौगले, नविद मुश्रीफ, कागलचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवानंद माळी, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष विकास पाटील, नगराध्यक्षा माया चौगले, शामराव पाटील, यमगेकर, शशिकांत खोत, दिलीपसिंह पाटील, बी. एम. जगताप, सुनील चौगले, बाचणीचे सरपंच सूर्यकांत पाटील, अरुण भोसले, सूर्याजी घोरपडे, रघुनाथ कुंभार, अॅड. जीवन शिंदे, एकनाथ देशमुख, आदी उपस्थित होते.
उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांनी स्वागत केले. माजी उपनगराध्यक्ष संतोषकुमार वंडकर यांनी प्रास्ताविक केले. रणजित सूर्यवंशी यांनी आभार मानले. (वार्ताहर)