जनता बझारमुळे मनपाचे सव्वा कोटीचे नुकसान
By Admin | Updated: January 22, 2016 00:54 IST2016-01-21T23:54:17+5:302016-01-22T00:54:02+5:30
चुकीची घरफाळा आकारणी : संभाजी जाधव यांची कारवाईची मागणी

जनता बझारमुळे मनपाचे सव्वा कोटीचे नुकसान
कोल्हापूर : कोल्हापूर जनता सेंट्रल को-आॅप. कंझ्युमर्स स्टोअर्स (जनता बझार)च्या भाडेकराराची तीस वर्षांची मुदत संपल्यानंतर दोन वर्षांपूर्वी नवीन तीस वर्षे मुदतीचा भाडेकरार केला आहे. मात्र, गेल्या २१ महिन्यांत जनता बझारने पावणेदोन कोटी थकबाकी भरली नाही. बझारच्या तीन इमारतींचा व्यावसायिक दराप्रमाणे घरफाळा न आकारल्याने महापालिकेस सुमारे १ कोटी १४ लाख ६७ हजार ५४६ रुपये नुकसान झाले आहे. या नुकसानीस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते संभाजी जाधव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
जाधव म्हणाले, जनता बझार यांनी १९७९ ते २००९ दरम्यान तीस वर्षे मुदतीने स्थायी समितीच्या मंजुरीप्रमाणे भाड्याने दिलेली मुदत दि. १६ आॅक्टोबर २००९ रोजी संपली त्यानंतर १ मार्च २०१४ रोजी तीस वर्षे मुदतीचा करार केला; पण पहिल्या कराराची मुदत संपल्यानंतर दि. १६ आॅक्टोबर २००९ ते १ मार्च २०१४ पर्यंत कोणतीही मंजुरी व मुदतवाढ न घेता जनता बझारने जागेचा वापर केला. जर वेळीच मुदतवाढ घेतली असती तर भाडेवाढ करुन महापालिकेचा आर्थिक फायदा झाला असता; पण पाच वर्षांचे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
सन २०१४ मध्ये महापालिकेच्या राजारामपुरी येथील इमारतीचे भाडे ५,३२,९२४ रुपये, रुईकर कॉलनी येथील इमारत भाडे ७० हजार रुपये, ए वॉर्ड वरुणतीर्थ येथील इमारत १,४६,६६० रुपये दरमहा भाडेतत्त्वावर दिली आहे. या तिन्हीही इमारतींचे २९ डिसेंबर २०१५ अखेर १ कोटी ७४ लाख २९ हजार २९८ रुपये इतकी थकबाकी भरलेली नाही.
महानगरपालिका व जनता बझार यांच्यातील करारानुसार भाडे दरमहा १० तारखेला देणे आवश्यक आहे. तसे न दिल्यास दर शेकडा १५ टक्के दराने व्याजासह भाडे देण्याची जबाबदारी भाडेकरूंनी स्वीकारली होती. यामुळे करारात त्यातूनही दोन महिन्यांपेक्षा जास्त भाडे देण्याचे राहिल्यास संबंधित मिळकत परत महापालिकेच्या कब्जात देण्याचे किंवा महापालिकेस तिचा कब्जा घेण्याचा अधिकार राहील, असे म्हटले आहे. तरीही जनता बझारकडून कोट्यवधींच्या रकमेची थकबाकी असताना या मिळकती महापालिकेने ताब्यात घेतलेल्या नाहीत.
रुईकर कॉलनी, बागल मार्केट, वरुणतीर्थ वेश येथील इमारतींना व्यापारी दराप्रमाणे भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणी केलेली नाही. त्यामुळे महानगरपालिकेस १ कोटी १४ लाख, ६७ हजार ५४६ रुपये नुकसान झालेले आहे. जनता बझारने कराराचा भंग केल्याने तो रद्द होऊन तत्काळ या सर्व इमारती महापालिकेने ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी आपण आयुक्तांकडे करणार असल्याचेही विरोधी पक्षनेते संभाजी जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
करारातील तरतुदीनुसार या इमारतीमध्ये पोटकूळ ठेवता येत नाही. मात्र, बागल मार्केट (राजारामपुरी) मधील इमारतीत पिझ्झा हट व आदित्य बिर्ला गु्रप हे पोटकूळ ठेवले आहे. जनता बझारमधील पिझ्झा हट या दुकानात २० रुपयांची बिसलेरी बाटली ४० रुपये दराने विकली जात आहे. त्यामुळे निव्वळ फायदा मिळविण्याच्या दृष्टीने या कंपन्यांची पोटकुळे ठेवली आहेत.